सुट्या नाण्यांचा तुटवडा दूर करण्यासाठी साडेचारशे व्यापाऱ्यांना नाण्यांचे वाटप
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २३ सप्टेंबर २०२६): – व्यापाऱ्यांना दैनंदिन आर्थिक व्यवहार करताना सुट्ट्या नाण्यांचा तुटवडा भासू नये, तसेच रोख व्यवहार अधिक सुलभ व्हावेत, यासाठी भारतीय स्टेट बँक, बारामती मुख्य शाखेच्या वतीने आज ‘कॉईन मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले. यावेळी व्यापाऱ्यांना प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते या नाण्यांचे वाटप करण्यात आले.

या मेळाव्यात बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशील सोमाणी, कार्याध्यक्ष जगदीश पंजाबी, उद्योजक अविनाश लगड, बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास किरवे, आदेश वडूजकर, आदी व्यापारी उपस्थित होते.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे चीफ मॅनेजर आदित्य गोगटे, नवनाथ नाळे, प्रकाश निंबाळकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
शहरातील सुमारे साडेचारशे व्यापाऱ्यांना सुट्ट्या नाण्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात बारामतीचे प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी व्यापाऱ्यांना ₹20 आणि ₹5 मूल्याच्या नाण्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक व्यापाऱ्याला त्यांच्या व्यवसायाच्या गरजेनुसार नाण्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहारांमध्ये सुट्ट्या पैशांची अडचण कमी होण्यास मदत होणार आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या या उपक्रमाचे व्यापारी वर्गातून स्वागत करण्यात आले. व्यापाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारात सुविधा मिळावी आणि आर्थिक व्यवहार अधिक सुरळीत व्हावेत, या उद्देशाने बँकेने हा उपक्रम आयोजित केल्याचे सांगण्यात आले.


