फलटण टुडे वृत्तसेवा ( सातारा दि २४ सप्टेंबर २०२६):-
सातारा ते लोणंद राष्ट्रीय महामार्ग ९६५ डी (NH-965D) वरील वाढे व वडूथ गावांजवळ असलेले वेण्णा व कृष्णा नदीचे ऐतिहासिक दगडी कमानीचे पूल मान्सूनमुळे धोकादायक बनले आहेत. पुलांमधून पाणी पाझरणे, तडे जाणे आणि कमानीची झीज झाल्याचे ‘NHAI’च्या पाहणीत निष्पन्न झाल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून या पुलांवरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३४ नुसार वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. हे वाहतुकीतील बदल दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ००.०१ वाजेपासून ते २० जून २०२७ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत लागू राहतील. NHAI कडून या ठिकाणी नवीन समांतर पुलांचे बांधकाम प्राधान्याने सुरू असून पुढील वर्षापर्यंत नवीन पुलांचे काम पूर्ण झाल्यावर जुन्या पुलांवरील वाहतूक कायमस्वरूपी बंद केली जाईल.
या कालावधीत लोणंदवरून साताऱ्याकडे येणारी अवजड वाहने लोणंदवरून खंडाळा किंवा शिरवळ मार्गे पुणे-बेंगलोर महामार्गावरून साताऱ्याकडे जातील. साताऱ्याकडून लोणंद व फलटणकडे जाणारी अवजड वाहने वाढे फाट्यावरून न वळता सरळ पुणे-बेंगलोर महामार्गाने खंडाळा किंवा शिरवळ मार्गे पुढे जातील. साताऱ्याकडून फलटणकडे जाणारी अवजड वाहतूक बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून कोरेगाव, पुसेगाव आणि ताथवडे घाट मार्गे फलटणकडे वळवण्यात आली आहे, तर फलटणकडून साताऱ्याकडे येणारी अवजड वाहनेदेखील याच ताथवडे घाट, पुसेगाव आणि कोरेगाव मार्गाने साताऱ्याकडे येतील. फलटण बाजूकडून आदर्की मार्गे साताऱ्याकडे येणारी अवजड वाहतूक आदर्की फाटा (फौजी ढाबा) येथून वाठार, पिंपोडे बुद्रुक, सर्कलवाडी, शिरगाव घाट आणि जोशीविहीर मार्गे पुणे-बेंगलोर महामार्गाने साताऱ्याकडे येईल किंवा आदर्की फाट्यावरून लोणंद, खंडाळा किंवा शिरवळ मार्गे साताऱ्याकडे जाईल.
दरम्यान, नागरिक, विद्यार्थी व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच अत्यावश्यक सेवा लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसेस आणि स्कूल बसेसना या पुलांवरून ये-जा करण्यास मुभा देण्यात आली आहे. याशिवाय सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांच्या वाहतूक मार्गात कोणताही बदल करण्यात आलेला नाही; हलकी वाहने नेहमीप्रमाणेच या मार्गाने ये-जा करू शकतील. वाहतूक वळवलेल्या सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहनचालक व नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सातारा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
सातारा-लोणंद महामार्गावरील कृष्णा व वेण्णा नदीचे जुने पूल अवजड वाहतुकीसाठी बंद; पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांचे वाहतूक बदलाचे आदेश

