श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसाचा अनोखा उपक्रम; विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना खाट, बेडशीट व गाद्यांचे वाटप

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ८ ऑक्टोबर २०२६)::-
वाढदिवस म्हटला की केवळ शुभेच्छा, सत्कार आणि उत्सव न करता समाजातील गरजू घटकांसाठी काहीतरी विधायक कार्य करण्याची परंपरा निर्माण व्हावी, या उद्देशाने श्रीमंत संजीवराजे युवक प्रतिष्ठान (तरडगाव) आणि फलटण एज्युकेशन सोसायटीचे मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज (फलटण) यांच्या संयुक्त विद्यमाने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थी वसतिगृह, फलटण येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यक गरजेनुसार खाट, बेडशीट व गादीचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असणाऱ्या या वस्तूंचे वाटप करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद पाहायला मिळाला.


या कार्यक्रमास श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, डॉ. राजवैद्य, माजी आमदार दीपक चव्हाण, मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य बाळकृष्ण काळे, उपप्राचार्य सौ. पूनम कदम, पर्यवेक्षक राजेंद्र माडकर, पर्यवेक्षक सी. टी. कर्वे, सातारा जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशाली कांबळे, फलटण पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, पंचायत समिती सदस्या सौ. नीलिमा गायकवाड, पंचायत समितीचे माजी सदस्य बाबासाहेब खरात, श्रीराम सहकारी कारखान्याचे संचालक महादेव माने, भाऊसाहेब कापसे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि इयत्ता ११ वी व १२ वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमा दरम्यान वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड देत अत्यंत मौलिक संदेश देण्यात आला. झाड स्वतःसाठी काहीही न ठेवता सावली, फळे आणि फुले देऊन इतरांचे जीवन समृद्ध करते; त्याचप्रमाणे समाजात प्रत्येकाने आपल्या परीने गरजू घटकांना मदतीचा हात दिला पाहिजे, असे विचार याप्रसंगी व्यक्त करण्यात आले. याशिवाय ‘एक व्यक्ती — एक वृक्ष’ ही काळाची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतानाच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी ओळखावी, असे आवाहन करण्यात आले. प्रत्येक नागरिकाने व विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मनोज कदम यांनी मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!