फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती , दी २४ सप्टेंबर २०२६):-
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन व विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उद्योजकांच्या विशेष आरोग्य तपासणी शिबिरास बारामती एमआयडीसी व परिसरातील उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उदंड प्रतिसाद दिला. या शिबिरात 400 हून अधिक उद्योजकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
बारामती शहर व एमआयडीसी मधील कंपन्यांच्या जवळ अंतरावरील तसेच सर्व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असणाऱ्या विश्वराज हॉस्पिटलच्या सहकार्याने बारामती इंडस्ट्रियल डेवलपमेंट असोसिएशनने हा उपक्रम राबवला.
कॅम्पमध्ये लिपिड प्रोफाइल, एचबीए १सी, सीरम क्रिएटिनिन, सीबीसी, रँडम ब्लड शुगर, आर एफ टी – रिनल फंक्शन टेस्ट, एल एफ टी – लिव्हर फंक्शन टेस्ट, दंतचिकित्सा, डोळ्यांची तपासणी, ईसीजी या महत्त्वपूर्ण तपासण्या करून तज्ञ डॉक्टरांकडून उद्योजकांना वैयक्तिक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांच्या शुभहस्ते व विजय पेटकर कार्यकारी अभियंता, यशवंत नलवडे मुख्य अग्निशमन अधिकारी, धनंजय जामदार, अध्यक्ष बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन , विश्वराज हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर डॉ. आशिषकुमार दोशी, कॉर्पोरेट मार्केटिंग मॅनेजर मनमित राजवाडे, विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी बारमती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबिरशाह शेख वकील, कार्यकारणी सदस्य महादेव गायकवाड, संभाजी माने, मनोज पोतेकर, खंडूजी गायकवाड, हरिश्चंद्र खाडे, विष्णू दाभाडे, हरीश कुंभारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

उद्योग व्यवसायाची वाढ करताना उद्योजकांनी प्रथम स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे व वेळप्रसंगी आजारपण उद्भवल्यास विश्वराज हॉस्पिटलच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन हनुमंत पाटील यांनी उद्घाटनाप्रसंगी बोलताना केले.
उद्योजक व्यवसाय करताना नेहमीच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. त्यांची आरोग्य कुंडली काढण्यासाठी विश्वराज हॉस्पिटलच्या सहकार्याने बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने हा उपक्रम राबवला आहे. यातून कोणताही आजार निष्पन्न झाला तर वेळीच उपचार सुरू करता येतील. बारामती पासून केवळ दीड तासाच्या अंतरावरील विश्वराज हॉस्पिटलच्या अत्याधुनिक सुविधांचा लाभ उद्योजक व कंपन्यांनी घ्यायला हवा असे मनोगत अध्यक्ष धनंजय जामदार यांनी व्यक्त केले.

एमआयटी चे संस्थापक विश्वधर्मी प्रा डॉ विश्वनाथ कराड सर यांच्या संकल्पनेतून आणि डॉ राहुल कराड व डॉ. आदिती कराड यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वराज हॉस्पिटलचे कामकाज चालत असून व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सेवाभावी वृत्तीने या ठिकाणी रुग्णांची सेवा केली जाते. बारामती एमआयडीसीतील कंपन्या व उद्योजकांनी विश्वराज हॉस्पिटलच्या विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वराज हॉस्पिटलचे डॉ दोशी यांनी प्रास्ताविकात केले.
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य संभाजी माने यांनी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आभार मानले.

