चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसी कडून जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त जनजागृती रॅली

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २७ सप्टेंबर २०२६):-
श्री सद्गुरू श्री वामनराव पै शिक्षण संस्थेच्या चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसी, कटफळ, बारामती कडुन २५ सप्टेंबर – जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त फार्मा रॅली व आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. औषधांचा योग्य वापर, औषध सुरक्षा, आरोग्यविषयक जनजागृती तसेच आरोग्य व्यवस्थेमध्ये फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही रॅली आयोजित करण्यात आली. या निमित्ताने बारामती येथील पेन्सिल चौकातून भव्य फार्मा रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी विविध जनजागृतीपर फलक, घोषवाक्ये आणि संदेशांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये औषधांविषयी योग्य माहिती पोहोचवली. “औषधांचा योग्य वापर करा, आरोग्याची काळजी घ्या,“फार्मासिस्ट हा आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे” अशा संदेशांद्वारे नागरिकांना जागरूक करण्यात आले.


या रॅलीच्या माध्यमातून फार्मासिस्टच्या सामाजिक व आरोग्यविषयक योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, आरोग्य जनजागृती आणि व्यावसायिक जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वयंऔषधोपचार (Self-Medication) या विषयावर सादर केलेले पथनाट्य. या पथनाट्याच्या माध्यमातून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे, औषधांचा चुकीचा वापर, प्रतिजैविकांचा (Antibiotics) अनावश्यक वापर आणि त्यामुळे उद्भवणारे आरोग्यविषयक धोके याबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमादरम्यान फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून फार्मासिस्ट बांधवांचा सन्मान करण्यात आला. समाजाच्या आरोग्य सेवेत फार्मासिस्ट बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.या कार्यक्रमात संस्थेचे विश्वस्त सौ. श्रद्धा मोकाशी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद पवार, विभागप्रमुख डॉ. हेमंत भोसले उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रा. सोनाल गावडे, प्रा. मंगेश हारोळे, प्रा. महेश वायाळ व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सर्वांच्या सहकार्यामुळे हा जनजागृतीपर कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!