महेश खुटाळे यांना सहसचिव पदाचे नियुक्तीपत्र देताना हॉकी महाराष्ट्राचे सचिव मनोज भोरे तर डावीकडून श्रीमती मनिषा आकरे, कैलास सोनार, मनोज भोरे, रमेश पिल्ले
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण, दि २८ सप्टेंबर २०२६):-
हॉकी इंडिया अंतर्गत महाराष्ट्रात हॉकी खेळाचा प्रचार, प्रसार आणि खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘हॉकी महाराष्ट्र’ संघटनेच्या सहसचिवपदी सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक महेश मधुकर खुटाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
हॉकी महाराष्ट्राचे सर्वेसर्वा मनोज भोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदी आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश, सचिवपदी मनोज भोरे तर सहसचिवपदी महेश खुटाळे यांची बिनविरोध निवड झाली. मैदानावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या आणि तळागाळातील खेळाडूंना घडवणाऱ्या क्रीडाप्रेमींनाच कार्यकारिणीत संधी देण्याचा निर्णय संघटनेने घेतला होता.

४६ वर्षांच्या क्रीडा सेवेची पावती:
महेश खुटाळे यांनी गेल्या ४६ वर्षांत खेळाडू, प्रशिक्षक, राष्ट्रीय पंच, निवड समिती सदस्य आणि खेळाडूंना रोजगाराचे मार्गदर्शन अशा विविध भूमिका यशस्वीपणे बजावल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालील संघांनी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेपर्यंत धडक मारली आहे. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा आणि योगदानाचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील हॉकी क्षेत्राला व्हावा, म्हणूनच त्यांची या पदी निवड करण्यात आल्याचे सचिव मनोज भोरे यांनी स्पष्ट केले.

फलटणमध्ये ‘ॲस्ट्रोटर्फ’साठी पाठपुरावा करणार:
आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना महेश खुटाळे म्हणाले की, “या संधीच्या माध्यमातून सातारा आणि फलटण परिसरातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल. तसेच फलटणमध्ये हॉकी खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘टर्फ मैदान’ उपलब्ध व्हावे, यासाठी हॉकी इंडिया व हॉकी महाराष्ट्रकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल.” याशिवाय क्रीडा विभागाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ सर्व जिल्हा संघटनांना मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव:
महेश खुटाळे यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंतराव शेडगे, ‘द हॉकी सातारा’चे अध्यक्ष बाहुबली शहा, उपाध्यक्ष सचिन लाळगे, खजिनदार पंकज पवार, क्रीडा प्रशिक्षक सचिन धुमाळ, बी. बी. खुरंगे, धनश्री क्षीरसागर, तसेच जिल्ह्यातील आजी-माजी राष्ट्रीय खेळाडू व क्रीडाप्रेमींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.


