शिवनेरी कबड्डी स्पर्धेतपंचगंगाची विजयी आगेकूच

फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई दि १२ ऑक्टोबर २०२६):- शिवांश मगरच्या पल्लेदार चढाया आणि वेदांत देसाईच्या पोलादी पकडीच्या जोरावर शिवनेरी सेवा मंडळ, दादर आयोजित कबड्डी स्पर्धेतील कुमार गटात पंचगंगा सेवा मंडळाने अटीतटीच्या लढतीत प्रतिस्पर्धी गोल्फादेवी सेवा मंडळाचा ४८-४७ असा अवघ्या एका गुणांच्या फरकाने पराभव करीत विजयी सलामी दिली.
शिवनेरी सेवा मंडळ, दादर यांच्या वतीने भवानी माता क्रीडांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कबड्डी महोत्सवाचे यंदाचे ५८ वे वर्ष आहे. मानाच्या शिवनेरी कबड्डी स्पर्धेने दरवर्षी मुंबईच्या कबड्डी हंगामाला सुरुवात होते. या महोत्सवात विशेष व्यावसायिक, प्रथम श्रेणी व्यावसायिक, कुमार आणि महिला अशा चार गटांमध्ये सामने रंगणार आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कुमार गटातील सामन्यांनी क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.


मुंबईच्या माजी महापौर नगरसेविका किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते या कबड्डीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विधानसभाप्रमुख व निखिल लॉजिस्टिकचे व्यवस्थापक सुरेश कदम, स्थानिक नगरसेविका उर्मिला पांचाळ, सुनीता आयरे, हरदीपसिंग लाली, प्रशांत घाडीगावकर, मंडळाचे प्रमुख कार्यवाह व उपविभागप्रमुख नितीन पेडणेकर, अध्यक्ष सुयोगी नाईक, कार्याध्यक्ष विष्णू तांडेल, देविदास कदम, सचिन मांजरेकर, किरण मोरजकर, संजय माजरेकर, शाखाप्रमुख समीर दळवी आणि सुरेश काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पंचगंगा सेवा मंडळाने मध्यंतराला २४-२३ अशी घेतलेली १ गुणांची आघाडी शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवली. गोल्फादेवी सेवा मंडळाच्या गुडेटी मोजेस आणि जितेंद्र पाटील यांनी कडवी झुंज देत दुसऱ्या हाफमध्ये जोरदार मुसंडी मारली पण अखेर एका गुणांच्या फरकाने त्यांना पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या फेरती पंचगंगाला यश क्रीडा मंडळाशी लढत द्यावी लागेल. यश क्रीडा मंडळाला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती.
कुमार गटातील इतर लढतीत समर्थ स्पोर्ट्स क्लबने संस्कृती प्रतिष्ठानचा १५ गुणांनी पराभव केला. समर्थ स्पोर्ट्स क्लबकडून चढाईत विराज कोंडावळे, तर पकडीमध्ये अथर्व मोहिते यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. संस्कृती प्रतिष्ठानकडून मनोज गोरे आणि सार्थक जाधव यांनी चांगला खेळ केला. दुसऱ्या सामन्यात गोकुळ क्रीडा मंडळाने वीर संताजी क्रीडा मंडळावर तीन गुणांनी मात केली. गोकुळ क्रीडा मंडळाकडून स्मित फाटक आणि दिव्यांश लाखन यांनी चढाईत, तर ऋषभ हजारे यांनी पकडीमध्ये योगदान दिले.
अन्य सामन्यांमध्ये बंड्या मारुती संघाने नवनाथ क्रीडा मंडळाचा ४७-३७ असा दहा गुणांनी पराभव केला. आकांक्षा क्रीडा मंडळाने एफडर्स युनायटेड संघावर ३३-२३ अशी दहा गुणांनी मात केली. सिद्धी प्रभा फाउंडेशनने गणेश स्पोर्ट्स क्लबचा ५५-२५ असा ३० गुणांनी पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.
कुमार गट संक्षिप्त निकाल : १. गोकुळ क्रीडा मंडळ (४१) विजयी विरुद्ध वीर संताजी क्रीडा मंडळ (३८) , २. समर्थ स्पोर्ट्स क्लब (५३) विजयी विरुद्ध संस्कृती प्रतिष्ठान (३८) , ३. पंचगंगा सेवा मंडळ (४८) विजयी विरुद्ध गोल्फादेवी सेवा मंडळ (४७) , ४. बंड्या मारुती संघ (४७) विजयी विरुद्ध नवनाथ क्रीडा मंडळ (३७), ५. आकांक्षा क्रीडा मंडळ (३३) विजयी विरुद्ध एफडर्स युनायटेड (२३), ६. सिद्धी प्रभा फाउंडेशन (५५ ) विजयी विरुद्ध गणेश स्पोर्ट्स क्लब (२५)


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!