तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत मुधोजी हायस्कूलचा दबदबा; १४, १७ व १९ वर्षांखालील गटांत विजेतेपद पटकावत मारली बाजी

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण / ठाकुरकी दि ३० सप्टेंबर २०२६):-
श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) जाधववाडी यांच्या वतीने अभियांत्रिकी महाविद्यालय (ठाकूरकी) येथे फलटण तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा बुधवारी (दि. ३० सप्टेंबर २०२६) अत्यंत उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १४, १७ आणि १९ वर्षांखालील तिन्ही गटांतील मुलांच्या संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत निर्विवाद वर्चस्व गाजवले व विजेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत तालुक्यातील मुधोजी हायस्कूल, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई व एसएससी), व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल फरंदवाडी आणि मालोजीराजे शेती शाळा या प्रमुख संघांनी सहभाग नोंदवला होता.
१४ वर्षांखालील गटातील अंतिम सामना मुधोजी हायस्कूल आणि श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) जाधववाडी यांच्यात पार पडला. नाणेफेक जिंकून मुधोजी हायस्कूलने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात ४४ धावा उभारल्या. यामध्ये सिद्धेश घनवट याने १२, हर्षदीप चौहान व रागवीर पवार यांनी प्रत्येकी ११, तर वैष्णव भोसले याने २ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल ४५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाला मुधोजीच्या अचूक गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणापुढे ५ षटकांत ३४ धावांपर्यंतच मजल मारता आली. मुधोजीच्या हर्षदीप चौहानने २ व वैष्णव भोसलेने १ बळी टिपला, तर सिद्धेश घनवटने एक गडी धावचित केला. मुधोजी हायस्कूलने हा सामना १० धावांनी जिंकून चषक पटकावला. याचप्रमाणे १७ आणि १९ वर्षांखालील गटांतही मुधोजी हायस्कूलच्या संघांनी चमकदार कामगिरी करत तालुकास्तरीय स्पर्धेत आपले अव्वल स्थान सिद्ध केले.
स्पर्धेप्रसंगी फलटण तालुका क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष तायप्पा शेंडगे, उत्तमराव घोरपडे, अमोल नाळे, सुजीत जमदाडे, शिवलिंग सावंत, संजय गोफणे, सूरज ढेंबरे, अमित काळे, महेश निंबाळकर, अमर कोकरे व सोमनाथ चौधरी उपस्थित होते. सामन्यांचे काम ज्येष्ठ क्रिकेट पंच संजय गायकवाड, रवींद्र दळवी, अमोल नाळे व रोहन निकम यांनी पाहिले.
तिन्ही गटांतील या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, ज्युनिअर कॉलेज उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, विजय लोंढे पाटील, सौ. पूजा पाटील, फ.ए.सो. क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे कौतुक करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!