शिवाजी विद्यापीठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत मुधोजी महाविद्यालयाचा डंका; सर्वसाधारण तृतीय क्रमांकाच्या चषकासह ४ रौप्यपदकांची कमाई

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ४ ऑक्टोबर २०२६):-
कला व वाणिज्य महाविद्यालय, नागठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सातारा विभागीय बॉक्सिंग (मुले/मुली) स्पर्धा २०२६-२७ मध्ये मुधोजी महाविद्यालय, फलटणच्या महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. स्पर्धेत अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत मुधोजी महाविद्यालयाने सर्वसाधारण तृतीय क्रमांकाचा चषक पटकावला.


या विभागीय स्पर्धेत मुधोजी महाविद्यालयाच्या चार खेळाडूंनी आपापल्या वजनगटात अंतिम फेरीत धडक मारत रौप्यपदक (द्वितीय क्रमांक) पटकावले. यामध्ये कु. ऋतुजा तांबे हिने ४५ ते ४८ किलो वजनगटात, कु. स्वरांजली तरटे हिने ५७ ते ६० किलो वजनगटात, कु. अदिती जाधव हिने ७० ते ७५ किलो वजनगटात आणि कु. ज्ञानेश्वरी रणवरे हिने ८० किलोवरील वजनगटात चमकदार कामगिरी करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले.


मुधोजी महाविद्यालयाच्या या यशाबद्दल आणि सर्वसाधारण तृतीय क्रमांकाचा चषक पटकावल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम आणि मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पी. एच. कदम यांनी सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील आंतरविभागीय व विद्यापीठ स्तरावरील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!