सूरज ढगे आणि यशराज महामुलकर यांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १३ ऑक्टोबर २०२६): –
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे; जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा २०२६-२७ मध्ये फलटणच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सूरज ढगे आणि यशराज महामुलकर या दोन्ही खेळाडूंची कोल्हापूर विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे फलटणच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

१९ वर्षांखालील मुलांच्या गटात झालेल्या या स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी कौशल्य, जिद्द, मेहनत आणि खेळातील शिस्त यांच्या जोरावर आपली छाप पाडली. त्यांच्या या यशामागे मार्गदर्शक शिक्षक प्रा. उत्तमराव घोरपडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. योग्य प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले असून, आगामी विभागीय स्पर्धेतही ते उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे मा. सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ऊर्फ बाबा, प्रशासनाधिकारी श्री. अरविंद निकम, प्रशालेचे प्राचार्य श्री. बाळकृष्ण काय, उपप्राचार्य सौ.पूनम कदम, उपमुख्याध्यापक श्री. राजेंद्र माडकर, पर्यवेक्षक श्री. सि.टी. कर्वे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.
सूरज ढगे आणि यशराज महामुलकर यांच्या या यशामुळे फलटणच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्राच्या नावलौकिकात भर पडली आहे. दोन्ही खेळाडूंनी आगामी कोल्हापूर विभागीय स्पर्धेतही यशाची परंपरा कायम राखावी आणि फलटणचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षक, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी दिल्या आहेत.

