फलटण टुडे वृत्तसेवा (म्हसवड, दि २४ नोव्हेंबर २०२६): ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने वेळेत बसेस उपलब्ध करून दिल्या जातील, असे ठोस आश्वासन दहिवडी आगाराचे व्यवस्थापक गोरसाडे यांनी दिले. येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट देऊन विद्यार्थ्यांशी व शाळा प्रशासनाशी थेट संवाद साधला.
या भेटीदरम्यान दहिवडी आगार व्यवस्थापक गोरसाडे, माजी वाहतूक नियंत्रक भुजबळ, म्हसवड बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक कोळी तसेच दादा खाडे यांनी शाळेस भेट देऊन विद्यार्थिनींसाठी असलेल्या मोफत बस पास योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाबाबत मार्गदर्शन करतानाच, दैनंदिन प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणी व समस्या मान्यवरांनी जाणून घेतल्या. शालेय वेळेनुसार बस फेऱ्यांचे योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांना वेळेवर बस सेवा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. बी. टेंबरे यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक पी. ए. भवारी, एस. जी. म्हमाणे, आर. बी. कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी सोडवण्यासाठी एसटी महामंडळाने घेतलेल्या या सकारात्मक पुढाकाराचे शाळा प्रशासन व पालक वर्गातून स्वागत होत आहे.

या सर्व उपक्रमाबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या निर्णयाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ सदस्य,सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन, उपाध्यक्ष व सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, सिद्धनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक जी. बी. टेंबरे, शिक्षक वृंद तसेच पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

