ड्रॉ (सोडत) काढण्यापूर्वी लहान मुलांसाठी आयोजित क्रिकेट स्पर्धा संबंधी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर शेजारी क्रिकेट ॲकॅडमी ऑफ चॅम्पियन्सचे अशोक गाडगीळ.
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. २७ एप्रिल२०२६): – १२ व १४ वर्षे वयोगटाखालील लहान मुलांसाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून या अत्यंत लोकप्रिय खेळातील माहिती आपल्या मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे किंबहुना या महत्त्वपूर्ण खेळांमध्ये त्यांना सहभागी होऊन त्यामधील निष्णात खेळाडू होता आले पाहिजे या दृष्टीकोनातून गेल्या ४ वर्षापासून फलटण येथे सुरु असलेल्या या स्पर्धा निश्चित उपयुक्त आणि प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले आहेत.

फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती आणि क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स यांच्या संयुक्त सहभागाने येथील माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल (घडसोली मैदान), शिंगणापूर रोड, फलटण येथील मैदानावर १२ व १४ वर्षाखालील बाल खेळाडूंसाठी दि. ३ ते २० मे दरम्यान गोविंद चषक अंतर्गत लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातून नामांकित क्रिकेट अकॅडमी मधील खेळाडू संघ सहभागी झाले आहेत. या सर्व सहभागी खेळाडू संघासाठी १२ व १४ वर्षाखालील संघाची सोडत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटण पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते यांच्या हस्ते काढण्यात आली, त्यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी श्रीराम सहकारी साखर सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेवराव माने, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, दशरथराव नाईक निंबाळकर, क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्सचे अशोक गाडगीळ, आर्यन गाडगीळ, अवि कांबळे उपस्थित होते.
सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरु असून सर्वत्र या स्पर्धा औत्सुक्याने पाहिल्या जात असताना आपल्या मुलांना अशा स्पर्धांमध्ये सहभागी होता आले पाहिजे ही अपेक्षा अनेक पालक व्यक्त करीत असताना फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स, फलटण यांच्या माध्यमातून ३ वर्षांपूर्वी फलटण येथे या स्पर्धांना सुरुवात झाली असून त्यांना प्रतिवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे निदर्शनास आणून देत या स्पर्धांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.

या स्पर्धांना केवळ मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभतो आहे असे नव्हे तर या माध्यमातून फलटणमधील अनेक बाल क्रिकेट स्पर्धक जिल्हा व राज्य पातळीवरील स्पर्धामध्ये सहभागी होऊन यशस्वी होताना पाहिल्यानंतर या स्पर्धा उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले असल्याने फलटणकरांनी या स्पर्धांना प्रतिसाद देताना येथील मैदानावर प्रत्यक्ष स्पर्धा सुरु असताना त्या पाहण्यासाठी उपस्थित राहून या शहर व तालुक्यातील लहान मुले उत्तम प्रकारे क्रिकेट खेळतात हे पहावे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.

हा तांत्रिक खेळ असून ते तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी या लहान मुलांना प्रशिक्षणाची गरज असल्याचे लक्षात घेऊन स्वतः गाडगीळ त्यासाठी प्रयत्न करतात की अत्यंत समाधानाची बाब असून सर्वांनी त्यांना साथ करावी असे आवाहनही यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण येथील या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित क्रिकेट अकॅडमींचा सहभाग असून, १२ वर्षाखालील वयोगटासाठी ड्रॉ (सोडत) जाहीर करण्यात आला, त्यानुसार गट अ : १) क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स बी, २) अजित वाडेकर क्रिकेट अकॅडमी, ३) क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ए, ४)
नेरळकर क्रिकेट अकॅडमी औरंगाबाद.
गट ब : १) प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमी, सातारा, २) क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स सी, ३) राजस्थान रॉयल्स क्रिकेट अकॅडमी, ४) बारामती स्मॅशर्स.
१४ वर्षाखालील गटासाठी ड्रॉ (सोडत) गट अ : १) सारा क्रिकेट अकॅडमी, २) क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स सी, ३)
मिलिंद गुंजाळ स्पोर्ट्स अकॅडमी, ४) बारामती स्मॅशर्स, ५) राजस्थान रॉयल्स क्रिकेट अकॅडमी.
१४ वर्षाखालील गट ब : १) रायझिंग क्रिकेट अकॅडमी, २)
नेरळकर क्रिकेट अकॅडमी, औरंगाबाद, ३) क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ए, ४) क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स बी, ५) प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमी, सातारा.
या गटांमधून सोडत जाहीर करण्यात आली असून पुढील फेरीकरिता पात्र ठरण्यासाठी संघांमध्ये चुरशीची स्परहायला मिळणार आहे.
या स्पर्धेमुळे ग्रामीण व शहरी भागातील तरुण क्रिकेटपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार असून, भविष्यातील खेळाडू घडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


