महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी अशोक गाडगीळ यांची फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती

अशोक गाडगीळ.


फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि. ६ जून २०२६): क्रिकेट क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षक अशोक गाडगीळ यांची महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे फलटणसह सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
क्रिकेट क्षेत्रातील दीर्घ अनुभव, खेळाडू घडविण्याची क्षमता आणि तांत्रिक ज्ञानाच्या बळावर अशोक गाडगीळ यांनी राज्यातील युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या प्रशिक्षकत्वाखाली अनेक खेळाडूंनी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून झालेली नियुक्ती ही त्यांच्या कार्याचा गौरव मानली जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे युवा खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळणार असून महाराष्ट्र संघाच्या कामगिरीतही भर पडेल, असा विश्वास क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे.


क्रिकेट अकादमी ऑफ चॅम्पियन्स तसेच विविध क्रीडा संघटनांच्यावतीने, तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सोसायटी नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सोसायटी क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे यांनीही अशोक गाडगीळ यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही नियुक्ती फलटणच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद मानली जात आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!