फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २३ जुलै २०२६):-महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषि महाविद्यालय, फलटण येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील बी.एस्सी. (कृषी) चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत अनुभवाधारित कृषी कौशल्य विकास (Experiential Learning Module) अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमांतर्गत SRP ELM AHDS 405 – दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन तंत्रज्ञान हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना दुग्ध उत्पादन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, मूल्यवर्धन, पॅकेजिंग, ब्रँडिंग, विपणन आणि दुग्ध उद्योजकतेचे सर्वंकष प्रशिक्षण दिले जात आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० चे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता उद्योगाभिमुख, कौशल्याधारित आणि रोजगारक्षम शिक्षण प्रदान करणे होय. त्याच धर्तीवर कृषि महाविद्यालय, फलटण येथे राबविण्यात येणारा हा प्रकल्प विद्यार्थ्यांना दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योगातील संधी आणि स्वयंरोजगाराच्या विविध पर्यायांची प्रत्यक्ष ओळख करून देत आहे. कृषी व्यवसायाला पूरक म्हणून दुग्ध व्यवसायाचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय दृष्टीकोन विकसित करण्यावर या प्रकल्पामध्ये विशेष भर देण्यात आला आहे.
भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून दुग्ध व्यवसायाला विशेष स्थान आहे. शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय कृषी क्षेत्राला आर्थिक स्थैर्य प्रदान करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधुनिक दुग्ध उत्पादन आणि प्रक्रिया तंत्रज्ञान आत्मसात करून भविष्यात स्वतःचा दुग्ध प्रक्रिया उद्योग उभारावा, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करावी आणि शेतकरी उत्पादकांना मूल्यवर्धनाद्वारे अधिक उत्पन्न मिळवून द्यावे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे.
या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना दूध संकलन, दूधाची गुणवत्ता तपासणी, स्वच्छ दूध उत्पादन, दूधाचे शास्त्रीय हाताळणी तंत्र, शीतसाखळी व्यवस्थापन, दूध प्रक्रिया, पाश्चरायझेशन, सुरक्षित साठवण आणि गुणवत्तेचे निकष यांचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. दूधातील स्निग्धांश, एस.एन.एफ., घनता, शुद्धता, भेसळ तपासणी, स्वच्छता व्यवस्थापन आणि ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे शिकविल्या जात आहेत.
कौशल्य विकास उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना तूप, लोणी, श्रीखंड, दही, ताक, पनीर, चीज, फ्लेवर्ड मिल्क, लस्सी, आईस्क्रीम, खवा, कलाकंद, बासुंदी तसेच इतर विविध दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन तंत्रज्ञान शिकविले जात आहे. प्रत्येक उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल, उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, स्वच्छता, पॅकेजिंग, साठवणूक, शेल्फ लाइफ वाढविण्याच्या पद्धती आणि ग्राहकांच्या पसंतीनुसार उत्पादन विकसित करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना मूल्यवर्धित दुग्ध उत्पादनांच्या माध्यमातून अधिक आर्थिक लाभ कसा मिळविता येतो, याचे मार्गदर्शन केले जात आहे. एफएसएसएआय/एफडीए यांच्या मानांकनुसार दूध संकलन, दुध सुरक्षा, दुधाचे वर्गीकरण, दुधाचे स्वच्छता व निर्जंतुकीकरण तसेच दुध उत्पादनाचे आकर्षक ब्रँडिंग, लेबलिंग, मूलभूत अन्नसुरक्षा संकल्पना, बाजारपेठेचा अभ्यास, किंमत निर्धारण, विक्री व्यवस्थापन, डिजिटल विपणन, ग्राहक सेवा, खर्च-उत्पन्न विश्लेषण आणि लघु दुग्ध उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेल्या व्यवसाय व्यवस्थापन कौशल्यांचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
सदरील प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना केवळ उत्पादन प्रक्रिया शिकण्याची संधी मिळत नसून, प्रत्यक्ष उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेले नियोजन, गुणवत्ता नियंत्रण, नोंदवही लेखन, आर्थिक व्यवस्थापन, विपणन आणि ग्राहकाभिमुख दृष्टिकोन विकसित करण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दुग्ध प्रक्रिया उद्योग, दुग्ध सहकारी संस्था, कृषी स्टार्टअप किंवा स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत आहे. प्रकल्प अधिकारी म्हणून डॉ. आर. व्ही. कर्चे, सहायक प्राध्यापक, पशुविद्यान व दुग्धशास्त्र विभाग, हे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आधुनिक प्रयोगशाळेमध्ये तसेच प्रत्यक्ष प्रक्रिया केंद्रात प्रशिक्षण दिले जात आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वच्छता, गुणवत्ता, अन्नसुरक्षा आणि व्यवसाय व्यवस्थापन यांचा समन्वय साधण्यावर विशेष भर दिला जात आहे.
कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात येत असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या उद्दिष्टांनुसार विद्यार्थ्यांना कौशल्याधारित, उद्योगाभिमुख आणि उद्योजकतेसाठी सक्षम बनविण्यावर कृषि महाविद्यालयाचा विशेष भर असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रामध्ये शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे, ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे ही काळाची गरज असून, हा प्रकल्प त्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
अनुभवाधारित प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, गुणवत्ता व्यवस्थापन, नवोपक्रम, उद्योग उभारणीची क्षमता, नेतृत्वगुण आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना विकसित होत आहे. दुग्ध व्यवसाय हा कृषी क्षेत्राचा अविभाज्य भाग असल्याने अशा प्रकारचे कौशल्याधारित प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
ज्ञान, कौशल्य, संशोधन, उद्योग आणि कृषि विस्तार यांचा समन्वय साधणारा SRP ELM AHDS 405 – दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन तंत्रज्ञान हा प्रकल्प भविष्यात सक्षम, रोजगारक्षम, उद्योगाभिमुख आणि आत्मनिर्भर कृषी पदवीधर तसेच फलटण पंचक्रोशीतील युवकांना कृषि उद्योजक घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करणारा हा उपक्रम असल्याचे महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले.
(शब्द संकलन: डॉ. जी. बी. अडसूळ, कृषि विस्तार विभाग)

