फलटण बाजार समितीत भुसार मालाची समाधानकारक आवक; कांद्याचे भाव तेजीत

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ११ ऑक्टोबर २०२६): –
कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण येथील मुख्य बाजारात भुसार माल आणि कांद्याची आवक समाधानकारक राहिली असून, बाजारात कांद्याचे दर तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे. रविवार, दि. ४ ऑक्टोबर आणि मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या लिलावातील घाऊक बाजारभाव बाजार समिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत.


रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या भुसार बाजारात ज्वारीची ४२ क्विंटल आवक झाली असून प्रतिक्विंटल ३,४०० ते ६,३०० रुपये दर मिळाला. बाजरीची १७८ क्विंटल आवक होऊन २,५०० ते ३,००० रुपये, तर गव्हाची ३१४ क्विंटल आवक होऊन २,६०० ते २,९४५ रुपये दर नोंदवला गेला. हरभऱ्याची २६ क्विंटल आवक होऊन ६,००० ते ७,४५० रुपये तर मक्याची १९१ क्विंटल आवक होऊन २,४५० ते २,७०० रुपये भाव मिळाला. खपली गव्हाची ११ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ४,२०० रुपये स्थिर दर मिळाला. याशिवाय उडदाची ३० क्विंटल आवक होऊन ७,५०० ते ९,५०० रुपये, हिरव्या मुगाची २६ क्विंटल आवक होऊन ७,५०० ते १०,००० रुपये तर पिवळ्या मुगास प्रतिक्विंटल १०,००० ते १६,००० रुपये असा चांगला भाव मिळाला. घेवड्याची २० क्विंटल आवक नोंदवली गेली असून त्यास ५,५०० ते ९,३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.


दरम्यान, मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी फलटण मुख्य बाजारात पार पडलेल्या कांदा लिलावात एकूण ७५० क्विंटल म्हणजेच तब्बल १,५०० पिशव्या कांद्याची आवक झाली. या दिवशी कांद्याचे दर तेजीत राहून प्रतिक्विंटल किमान १,५०० रुपये, कमाल ५,००१ रुपये तर सरासरी ३,००० रुपये असा दर नोंदवला गेला. कांद्याच्या दरातील या तेजीमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!