फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २७ सप्टेंबर २०२६):-
‘श्रीराम’च्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद, शेतकरी आणि कामगारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत यंदाचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालवला जाईल व ऊस उत्पादकांना स्पर्धात्मक दर दिला जाईल, अशी ग्वाही आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ या आगामी गळीत हंगामातील मिल रोलर पूजन सोहळा आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला. या प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, उपाध्यक्ष नितीन शाहूराज भोसले, संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले की, ऊस उत्पादकांना स्पर्धात्मक दर, वेळेवर ऊसबिल आणि कामगारांना पगार व भत्ते वेळेत देऊन ‘श्रीराम’चे सहकार तत्त्वावर यशस्वी पुनरुज्जीवन करण्यात आले आहे, ज्यामुळे सहकार क्षेत्रात नवा आदर्श निर्माण झाला आहे. विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले की, सत्तेचा गैरवापर करून कारखाना बंद पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु त्यांना यात कधीही यश आलेले नाही आणि येणार नाही. विरोधकांनी आधी स्वतःच्या कारखान्यांकडे लक्ष द्यावे. ‘श्रीराम’शी काडीमात्र संबंध नसताना जनतेला खोटी आश्वासने दिली जात असल्याचा आरोप करत आम्ही आमच्या लोकांच्या न्यायानेच पुढे जाऊ, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उर्वरित प्रतिटन १०० रुपये दिवाळीपूर्वी जमा करणार:
गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३३०० रुपये भाव देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी ३२०० रुपये आधीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले असून, उर्वरित प्रतिटन १०० रुपये दिवाळीपूर्वी जमा केले जातील, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी दिली.
कार्यक्रमप्रसंगी संचालक शरदराव रणवरे व शेतकरी हणमंत चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष खटके यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर सुखदेव बेलदार पाटील यांनी आभार मानले.


