सेवा संकल्प अभियानंतर्गत जिल्ह्यात जलसेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करा– जिल्हाधिकारी संतोष पाटील

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि २ ऑक्टोबर २०२६):- यंदा पावसाचे असमान वितरण आणि पावसातील मोठ्या खंडामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देणे ही सर्व विभागांची सामूहिक जबाबदारी असून, दुष्काळाचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. पुढील पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी पुरेल, अशा पद्धतीने पाण्याचे काटेकोर नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

सेवा संकल्प अभियानांतर्गत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे आणि सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलसेवा संकल्प अभियान २०२६’ चा शुभारंभ गुरुवारी जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी कृष्णा-कोयना, वेण्णा, उरमोडी आणि तारळी या नद्यांच्या पाण्याचे कलशपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. २ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, “पुढील काही महिने परीक्षेचे आहेत. जलसंपदा विभागावर मोठी जबाबदारी आहे. पाणी हे जीवन आहे. जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरलेली असली, तरी भूजल पातळीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यामुळे दुष्काळाशी सामना करण्याची क्षमता आहे; मात्र त्याचे योग्य नियोजन गरजेचे आहे.”

“सिंचन क्षमता निर्माण करण्याबरोबरच पाण्याचे न्याय्य वाटप महत्त्वाचे आहे. शेवटच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देणे याला प्राधान्य द्यावे. जलसंपदा विभागाने पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल, अशा पद्धतीने नियोजन करावे. कृषी विभागाने ‘प्रति थेंब अधिक पीक’ या संकल्पनेवर आधारित उपक्रमांना चालना द्यावी. बागायती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कमी पाण्यात उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,” असेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचत आणि जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन केले. जलसंपदा विभागाने इतर विभागांशी समन्वय साधून पाणी बचतीच्या कामांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

अधीक्षक अभियंता जयंत शिंदे म्हणाले, “पाणी वाचवणे ही आजची गरज आहे. पाणी बचतीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे महत्त्वाचे असून, याची मोठी जबाबदारी जलसंपदा विभागावर आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे परिस्थिती आव्हानात्मक आहे. त्यामुळे पुढील हंगामापर्यंत उपलब्ध पाणी जपणे आवश्यक आहे.”

जलसेवा, जलजागृतीवर भर

जलसेवा संकल्प अभियानांतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या सिंचन व्यवस्थापनाबाबत जनजागृती, जलपूजन व जलदिंडी, सिंचन ई-प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी व वसुलीबाबत तक्रार निवारण, पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन, उपसा सिंचनाच्या पाणी परवानगीसाठी शिबिरे तसेच धरणे, कालवे व वितरण व्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

याशिवाय कालवे व वितरण व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे निश्चित करणे, श्रमदानातून कालवे व धरण परिसरातील झाडे-झुडपे स्वच्छ करणे, पुनर्वसित गावांना भेटी देऊन प्रकल्पबाधितांच्या अडचणी सोडविणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.

जलसंपदा व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने पिक पद्धतीतील बदल, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन याबाबत बैठका, प्रदर्शने, कार्यशाळा व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी कार्यक्रम, लाभधारक मेळावे, चर्चासत्रे तसेच कालवे व वितरण व्यवस्थेच्या पाहणी दौऱ्यांचे आयोजन केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये पाणी, पाण्याची गुणवत्ता, स्थानिक सिंचन प्रकल्प व जलव्यवस्थापनाबाबत जागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये चित्रकला, वक्तृत्व आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. जिल्हा व तालुकास्तरावर जलसंपदा प्रकल्पांची माहिती देणारी प्रदर्शने, तसेच कीर्तन, भजन, भारूड आणि पथनाट्याच्या माध्यमातून जलजागृती केली जाणार आहे.

जलसंपदा विभागाच्या सेवा अधिक सुलभ, तत्पर, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याबरोबरच पाणीवापर संस्थांचे सक्षमीकरण, पाणीवाटपातील पारदर्शकता आणि धरण-कालव्यांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यावर अभियानात भर देण्यात येणार आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!