फलटणच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व सेवाभावी क्षेत्रातील ५० वर्षांहून अधिक काळचे योगदान; वयाच्या ९३ व्या वर्षी निधन
फलटण टुडे वृत्तसेवा : फलटणच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सेवाभावी क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ निष्ठेने कार्यरत राहिलेले, लायन्स क्लब ऑफ फलटणचे संस्थापक सदस्य, ज्येष्ठ समाजसेवक तथा बॉम्बे फर्निचरचे सर्वेसर्वा स्वर्गीय लायन जगजीवन हिरजी गरवालिया (मिस्त्री) यांच्या निधनाने फलटणच्या सामाजिक जीवनातील एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता माळजाई मंदिर, फलटण येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
फलटण लायन्स क्लबच्या सुमारे ६० वर्षांच्या गौरवशाली सेवापरंपरेत संस्थापक सदस्य म्हणून स्वर्गीय जगजीवन हिरजी गरवालिया (मिस्त्री) यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लायन डॉ. आर. जी. करवा, लायन द्वारकादास भट्टड, लायन अर्जुनशेठ तेली आणि लायन जगजीवन गरवालिया (मिस्त्री) यांच्यासह तत्कालीन सहकाऱ्यांनी फलटणमध्ये लायन्स क्लबची स्थापना करून समाजसेवेचा भक्कम पाया घातला. फलटणच्या सामाजिक परंपरेतील समाजहिताला प्राधान्य देणाऱ्या विचारांचा वारसा त्यांनी आपल्या कार्यातून पुढे नेला.
अंधत्व निवारणाच्या चळवळीत मोलाचे योगदान
फलटण, माण, खटाव आणि खंडाळा या तालुक्यांमध्ये अंधत्व निवारणाची प्रभावी चळवळ उभी करण्यात फलटण लायन्स क्लबने महत्त्वाची भूमिका बजावली. पद्मभूषण डॉ. एम. सी. मोदी यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली बाजार समिती, मालोजीराजे शेती शाळा आदी ठिकाणी नेत्रतपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून हजारो नेत्ररुग्णांना मदत मिळाली.
त्या काळात आजच्यासारख्या आधुनिक बिनटाक्याच्या नेत्रशस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाइकांची निवास व भोजन व्यवस्था करणे हे मोठे आव्हान होते. मात्र, फलटणकरांच्या सहकार्याने लायन्स क्लबने ही जबाबदारी समर्थपणे पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी सलग सात दिवस निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येत असे. सलग १० ते १५ वर्षे राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून हजारो रुग्णांना दिलासा मिळाला.
या सेवाकार्याला पुढे संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी सुमारे २५ वर्षांपूर्वी लायन्स मुधोजी धर्मादाय नेत्र रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. आजही या रुग्णालयाच्या माध्यमातून नेत्रसेवेचे कार्य सुरू आहे. आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेने या रुग्णालयासाठी सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांची अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. यामुळे फलटण परिसरातील नेत्ररुग्णांना आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कार्याला बळ मिळाले.
वारकरी सेवा, रक्तदान आणि पर्यावरण संवर्धन
अंधत्व निवारणाबरोबरच आषाढी वारीदरम्यान संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण येथे मुक्कामी असताना लाखो वारकरी भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचार उपलब्ध करून देणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देणे, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन असे अनेक समाजोपयोगी उपक्रम लायन्स क्लब ऑफ फलटणच्या माध्यमातून सातत्याने राबविण्यात आले. स्वर्गीय लायन जगजीवन गरवालिया (मिस्त्री) या सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असत.
लायन्स क्लबच्या कार्याबरोबरच फलटण एज्युकेशन सोसायटी, माळजाई मंदिर देवस्थान ट्रस्ट, उघडा मारुती मंदिर देवस्थान ट्रस्ट, समाज प्रबोधन संस्था, प्रगत शिक्षण संस्था आदी संस्थांशी ते संबंधित होते. शहर आणि तालुक्यातील अनेक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. इतरांना सोबत घेऊन समाजकार्य करण्याची त्यांची पद्धत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. जाधववाडी येथे उभारण्यात आलेल्या श्री साई मंदिर देवस्थान ट्रस्टच्या कार्यातही त्यांनी विशेष सहकार्य केले.
लायन्स क्लब, माळजाई मंदिर आणि अन्य सेवाकार्यांमध्ये त्यांना लायन्स पदाधिकारी, शिवसंदेशकार, माजी आमदार लायन कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांची साथ व मार्गदर्शन लाभले. या सहकार्यामुळे अनेक समाजोपयोगी उपक्रमांना चालना मिळाली.
फाळणीनंतर फलटणमध्ये व्यवसायाची मुहूर्तमेढ
स्वर्गीय जगजीवन हिरजी गरवालिया (मिस्त्री) यांच्या कुटुंबाचा मूळ व्यवसाय कराची (पाकिस्तान) येथे बांधकाम क्षेत्राशी संबंधित होता. भारताच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंब महाराष्ट्रात आले. सहा भाऊ आणि दोन बहिणी असे त्यांचे मोठे कुटुंब होते. महाराष्ट्रात आल्यानंतर काही काळ त्यांनी बारामती येथे फर्निचर व्यावसायिकासोबत भागीदारीत व्यवसाय केला. त्यानंतर आपल्या बंधूंसमवेत फलटण येथे स्थायिक होऊन ‘बॉम्बे फर्निचर’ या व्यवसायाची सुरुवात केली.
काळाच्या ओघात बॉम्बे फर्निचरने फलटणमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. व्यवसायाबरोबरच समाजसेवेची बांधिलकी जपत त्यांनी आपले व्यावसायिक ठिकाण सामाजिक संपर्क आणि सेवाकार्याचेही केंद्र बनविले.
पुढील पिढीकडून सेवापरंपरेचे जतन
स्वर्गीय जगजीवन गरवालिया (मिस्त्री) यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि तीन मुली असा परिवार आहे. त्यांचे सुपुत्र राजेंद्र गरवालिया आणि महेश गरवालिया हे फर्निचर व्यवसायाबरोबरच बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे चुलत बंधू जितेश आणि अमित हेही फर्निचर व्यवसायात सहभागी आहेत. महेशशेठ यांचे सुपुत्र मीत आणि जीत हे बांधकाम व्यवसायाची जबाबदारी सांभाळत आहेत.
स्वर्गीय मिस्त्री यांनी जपलेला लोकसेवेचा वारसा लायन्स क्लब ऑफ फलटण, माळजाई मंदिर ट्रस्ट आणि उघडा मारुती मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून महेश गरवालिया पुढे चालवत आहेत. अशा प्रकारे व्यवसायाबरोबर समाजसेवेची परंपराही पुढील पिढीकडून जपली जात आहे.
३ ऑक्टोबर रोजी शोकसभेचे आयोजन
फलटणच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सेवाभावी क्षेत्रात ५० वर्षांहून अधिक काळ योगदान देणाऱ्या स्वर्गीय लायन जगजीवन हिरजी गरवालिया (मिस्त्री) यांच्या कार्याची आठवण जतन करण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता माळजाई मंदिर, फलटण येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
या शोकसभेस लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य, सहयोगी संस्थांचे प्रतिनिधी, शहरातील विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, उद्योजक तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून स्वर्गीय मिस्त्री यांच्या स्मृतींना अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत अखेरपर्यंत सेवाव्रत जपणाऱ्या स्वर्गीय लायन जगजीवन हिरजी गरवालिया (मिस्त्री) यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील. त्यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! गरवालिया कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना!
— अरविंदभाई मेहता
ज्येष्ठ पत्रकार, फलटण

