फलटणचा सुवर्णक्षण! आशियाई क्रीडा स्पर्धेत झळकलेल्या ऋतुजा पिसाळचा सोमवारी फलटण एज्युकेशन सोसायटीतर्फे भव्य रॅली व नागरी सत्कार

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ११ ऑक्टोबर २०२६):-
जपानमधील नागोया येथे पार पडलेल्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक सुवर्णविजय मिळवला आहे. या सुवर्णमयी कामगिरीत सात गोल आणि दोन हॅट्रिक नोंदवून भारतीय हॉकीच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारी फलटणची सुवर्णकन्या व कोळकी गावाची लेक कु. ऋतुजा दादासो पिसाळ हिच्या या अभूतपूर्व यशाचा गौरव करण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य रॅली व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.


ऋतुजा पिसाळ हिचा कोळकी गावाशी असलेला संघर्षमय प्रवास, तिची क्रीडा क्षेत्रातील जिद्द आणि नागोया आशियाई स्पर्धेत केलेली सात गोलांची ऐतिहासिक कामगिरी यामुळे संपूर्ण फलटण तालुक्याचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. फलटणचा अभिमान ठरलेल्या आपल्या या सुवर्णकन्येचा यथोचित सन्मान करण्यासाठी या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता ‘क्रांतीसिंह नाना पाटील चौक, फलटण’ येथून भव्य रॅलीस सुरुवात होणार आहे. शहरातून उत्साहात निघणारी ही रॅली मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे पोहोचल्यानंतर तेथे भव्य सत्कार समारंभ पार पडणार आहे.

यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते कु. ऋतुजा पिसाळ हिचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


तसेच या सोहळ्यास फलटण एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ सदस्य व विविध मान्यवर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, मुधोजी हायस्कूलचे शिक्षकवृंद, क्रीडाप्रेमी व फलटणकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आपल्या लाडक्या सुवर्णकन्येच्या स्वागतासाठी आणि तिच्या ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!