फलटण टुडे वृत्तसेवा (म्हसवड दि ५ ऑक्टोबर २०२६): –
माणदेशी चॅम्पियन्स फाउंडेशन, म्हसवड येथे मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या माण तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसवडच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात शाळेच्या खेळाडूंनी विविध मैदानी प्रकारांत पदकांची कमाई केली आहे.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंमध्ये ३००० मीटर वॉकिंग प्रकारात प्रांजली माने हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर याच क्रीडा प्रकारात प्रगती राजगे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. प्रांजली माने हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेतही द्वितीय क्रमांक पटकावत दुहेरी यश संपादन केले. ४०० मीटर हर्डल्स (अडथळा शर्यत) प्रकारात प्राची लोखंडे हिने प्रथम क्रमांक मिळवून अव्वल स्थान पटकावले. गोळाफेक स्पर्धेत स्वरांजली आंबासे हिने द्वितीय क्रमांक तर ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत वैष्णवी राजगे हिने तृतीय क्रमांक पटकावून पदकावर आपले नाव कोरले.

या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या सर्व विजेत्या खेळाडूंची सातारा येथे होणाऱ्या आगामी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांनी यशस्वी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

