सायली सुळ हिचा प्रथम क्रमांक; आरती ढोपरे, गौरी यादव आणि ज्ञानेश्वरी शिंदे यांचीही विभागीय स्पर्धेसाठी निवड

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १४ ऑक्टोबर २०२६):- मुधोजी क्लब, फलटण येथे आयोजित जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रशालेतील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत यशाची मोहोर उमटवली. या स्पर्धेत सायली सुळ हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर आरती ढोपरे हिने तृतीय क्रमांक, गौरी यादव हिने चौथा क्रमांक आणि ज्ञानेश्वरी शिंदे हिने पाचवा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. या चारही खेळाडूंची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खेळाडूंनी मिळवलेल्या या यशामुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हास्तरावर मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, सातत्यपूर्ण सरावाचे, जिद्दीचे आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाचे फलित आहे.

यापूर्वीही फलटणच्या सॉफ्ट टेनिस खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड मिळवली होती. आता मुलींच्या गटातील या चार खेळाडूंनीही आपल्या गुणवत्तेची छाप पाडत विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे फलटणच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
विभागीय स्पर्धेतही या खेळाडूंनी अशीच उत्कृष्ट कामगिरी करून सातारा जिल्ह्याचे आणि आपल्या प्रशालेचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या यशाबद्दल चारही खेळाडूंचे प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, क्रीडाशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

