फलटण टुडे वृत्तसेवा ( दिल्ली दि १३ ऑक्टोबर २०२६):–
दिल्ली येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठित नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटणच्या संघाने यशाची नवी उत्तुंग शिखरे गाठत इतिहास घडवला आहे. आज पार पडलेल्या अटीतटीच्या सामन्यात फलटणच्या संघाने बलाढ्य मणिपूर संघाचा ४-१ अशा मोठ्या गोलफरकाने धुव्वा उडवत स्पर्धेच्या ग्रूप स्टेजमधील अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच मुधोजी हायस्कूलच्या खेळाडूंनी आक्रमक आणि कौशल्याने परिपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. बलाढ्य मानल्या जाणाऱ्या मणिपूरच्या संघाला नामोहरम करत फलटणच्या खेळाडूंनी मैदानावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. उत्कृष्ट सांघिक कामगिरी आणि भक्कम बचावाच्या जोरावर मुधोजीच्या संघाने ४ गोल डागत ऐतिहासिक विजय साकारला.

या विजयात अत्यंत मोलाचे योगदान देणारी आणि संघाचे उत्कृष्ट नेतृत्व करणारी कर्णधार कु. अनुष्का केंजळे हिला या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘बेस्ट प्लेयर ऑफ द मॅच’ (Player of the Match) या बहुमानाने गौरविण्यात आले. प्रशिक्षक सचिन धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हा सन्मान स्वीकारला.
मुधोजी हायस्कूलच्या या अभूतपूर्व व ऐतिहासिक यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, क्रीडा समितीचे चेअरमन, प्राचार्य, शिक्षक, पालक आणि संपूर्ण फलटणकर क्रीडाप्रेमींमधून विजयी खेळाडूंचे, कर्णधार अनुष्का केंजळे व प्रशिक्षक सचिन धुमाळ यांचे मनापासून कौतुक व अभिनंदन केले जात आहे. पुढील सामन्यातही संघ अशीच देदीप्यमान कामगिरी करत विजेतेपद मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

