फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १३ ऑक्टोबर २०२६): –
फलटणचे श्रद्धास्थान श्री सद्गुरू हरिबाबा साधू महाराज यांच्या १८८ व्या प्रगट दिनानिमित्त व रथोत्सव सोहळ्यानिमित्त फलटण येथे मंगळवार, दि. २० ऑक्टोबर ते शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. श्री सद्गुरू हरिबाबा साधू महाराज देवस्थान ट्रस्ट, श्री सद्गुरू हरिबाबा रथोत्सव समिती आणि ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळ, फलटण यांच्या वतीने या चारदिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता रथोत्सवाची सुरुवात होणार असून, यादरम्यान महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (अध्यक्ष, श्री सद्गुरू हरिबाबा साधू महाराज देवस्थान ट्रस्ट) यांच्या शुभहस्ते रथ पूजन कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर सायंकाळी ७ ते १० या वेळेत ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळाची भजन व भारुड सेवा होईल.

बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता महाभिषेकाने दिवसाची सुरुवात होईल. सकाळी ८ ते ११ या वेळेत श्री हरिचरित्र वाचन व व्यासपीठावर श्री. चंदूकाका वादे यांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे. दुपारी १२ वाजता आरती, दुपारी ३ ते ५ या वेळेत लिलावती महिला भजनी मंडळाची भजनसेवा, तर सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ह.भ.प. दशरथ महाराज फडतरे (धामणवाडी) यांचे प्रवचन होईल. रात्री ८ ते ११ या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विनोदी भारुडसम्राट ह.भ.प. श्री. चंद्रकांत बर्गे महाराज व सहकलाकार यांची भारुड सेवा सादर होणार आहे.

गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता महाभिषेकानंतर सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पंचक्रोशीतील सांप्रदायिक भजनी मंडळांची भजनसेवा होईल. दुपारी २ ते ५ या वेळेत वीरशैव भजनी मंडळ, वीरशैव लिंगायत महिला भजनी मंडळ (फलटण) आणि श्री दुर्गा माता महिला भजनी मंडळ (कोळकी) यांची भजनसेवा होईल. विशाल भुजंगराव भोईटे यांच्या स्मृतीनिमित्त विठ्ठल मंदिराच्या प्रेरणेतून हा उपक्रम आयोजित केला आहे. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ह.भ.प. श्री. अंकुश महाराज ईवरे (पीएसआय, टाकळवाडा) यांची प्रवचनसेवा होईल. त्यानंतर सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत कॅसेट, चित्रपट व यूट्यूब फेम ‘श्री साई समर्थ भजनी मंडळ’ (विक्रमनगर, कोल्हापूर) यांची भजनसेवा होईल.

शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी अश्विन शुद्ध द्वादशीच्या दिवशी श्री सद्गुरू हरिबाबा महाराजांच्या प्रगट दिनाचा मुख्य सोहळा पार पडेल. सकाळी ६ वाजता महाभिषेक होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता श्रींच्या रथाचे प्रस्थान होईल. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते रथ प्रस्थानाचा कार्यक्रम संपन्न होईल.
सर्व विश्वस्त आणि भाविकांच्या उपस्थितीत निघणारी ही नगर प्रदक्षिणा श्रींच्या मंदिरापासून सुरू होऊन मलठणनंतर फलटण शहरातून पुढे जाईल. या मार्गामध्ये उघडा मारुती मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर परिषद, उपळेकर काका मंदिर, मेटकरी गल्ली, शिंपी गल्ली, श्रीराम मंदिर, गजानन चौक, मारवाड पेठ, शुक्रवार पेठ, शंकर मार्केट आणि बुरुड गल्ली या ठिकाणांचा समावेश आहे. या मार्गावरील भाविकांनी व नागरिकांनी नगर प्रदक्षिणेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होईल.
या चार दिवस चालणाऱ्या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात महाभिषेक, भजनसेवा, प्रवचन, भारुड आणि नगर प्रदक्षिणा अशा विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री सद्गुरू हरिबाबा महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

