मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य आणि गणिताचे व्यासंगी शिक्षक उद्धव खाडे सरांचे दु:खद निधन

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १५ ऑक्टोबर २०२६): – मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य, गणिताचे व्यासंगी व विद्यार्थीप्रिय शिक्षक उद्धव खाडे सर (वय ८२, मूळ रा. म्हसवड) यांचे दुखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील एक निष्टावंत आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने फलटण आणि म्हसवड परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
मूळचे म्हसवड येथील रहिवासी असलेल्या खाडे सरांनी आपले प्राथमिक शिक्षण म्हसवड येथे, तर माध्यमिक व उच्च शिक्षण मुधोजी हायस्कूल व मुधोजी कॉलेज, फलटण येथे पूर्ण केले. शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी म्हसवड येथून नोकरीची सुरुवात केली. अत्यंत क्लिष्ट मानले जाणारे गणित आणि भूमिती हे विषय सोप्या व रंजक पद्धतीने शिकवण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत प्रिय शिक्षक ठरले.
आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणूनही महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली. त्यानंतर १९९५ ते २००२ या कालावधीत त्यांनी मुधोजी हायस्कूलच्या प्राचार्यपदाची धुरा अत्यंत कुशलतेने सांभाळली. आपल्या प्रशासकीय कार्यकाळात त्यांनी शाळेची शैक्षणिक गुणवत्ता आणि शिस्त उंचावण्यासाठी विशेष योगदान दिले.
दिवंगत उद्धव खाडे सरांचे पार्थिव पुण्याहून फलटण येथे गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पोहोचेल. त्यानंतर सायंकाळी ६:३० वाजता विद्यानगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंतयात्रा निघणार आहे. मुधोजी परिवार, फलटण एज्युकेशन सोसायटी, माजी विद्यार्थी आणि क्रीडा-शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांकडून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!