फलटणच्या प्रभू श्रीरामचंद्र रथोत्सव २०२६ ; ४ ते १४ डिसेंबरदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमा चा रंगणार सोहळा

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २३ नोव्हेंबर २०२६): –
फलटण येथील ऐतिहासिक व धार्मिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या फलटण चे ग्रामदैवत प्रभू श्रीरामचंद्र रथोत्सव २०२६ चा रथोत्सव सोहळा दि ४ ते १४ डिसेंबरदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वस्ति श्री मन्नृपशालिवाहन शक १९४८ विश्वावसुनाम संवत्सर अंतर्गत होणारा हा रथोत्सव श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट, फलटण यांच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे.


रथोत्सवाची सुरुवात शुक्रवार, दिनांक ४ डिसेंबर २०२६ (कार्तिक कृष्ण १२, चित्रा) रोजी होईल. या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत कीर्तन, तर रात्री ९ ते ११ दरम्यान प्रभावळ वाहन सोहळा पार पडेल. शनिवार, दिनांक ५ डिसेंबर २०२६ (कार्तिक कृष्ण १३, चित्रा) रोजी सायंकाळी ५ ते ७ कीर्तन आणि रात्री ९ ते ११ अंबारी वाहन होईल. रविवार, दिनांक ६ डिसेंबर २०२६ (कार्तिक कृष्ण १३, स्वाती) रोजी सायंकाळी ५ ते ७ कीर्तन आणि रात्री ९ ते ११ शेष वाहन सोहळा रंगणार आहे. सोमवार, दिनांक ७ डिसेंबर २०२६ (कार्तिक कृष्ण १४, विशाखा) रोजी सायंकाळी ५ ते ७ कीर्तन आणि रात्री ९ ते ११ गरुड वाहन मिरवणूक निघेल.


मंगळवार, दिनांक ८ डिसेंबर २०२६ (कार्तिक कृष्ण ३०, अनुराधा) रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ११ ब्राह्मणांच्या हस्ते श्रीराम प्रभूंचा लघुरुद्राभिषेक होईल, दुपारी २ वाजता रथास पोशाख चढविण्यात येईल, सायंकाळी ५ ते ७ कीर्तन आणि रात्री ९ ते ११ दरम्यान मारुती वाहन सोहळा पार पडेल.
मुख्य रथयात्रा सोहळा बुधवार, दिनांक ९ डिसेंबर २०२६ (मार्गशीर्ष शुद्ध १, ज्येष्ठा) रोजी होणार आहे. या दिवशी सकाळी ७ ते ८ या वेळेत श्रीराम मंदिरात कीर्तन होईल. त्यानंतर सकाळी ८ वाजता ‘श्री’च्या मूर्ती श्रीराम प्रभूंच्या रथात विराजमान करून दिवसभर फलटण शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येईल आणि सायंकाळी ७ वाजता रथ परत श्रीराम मंदिरात येईल. तसेच सोमवार, दिनांक १४ डिसेंबर २०२६ (मार्गशीर्ष शुद्ध ५) रोजी ‘श्री’ची पाकाळणी होणार असून, सकाळी काकड आरतीनंतर ११ ब्राह्मणांच्या हस्ते श्रीरामास लघुरुद्राभिषेक व महापूजा होईल आणि सकाळी १० ते १२ या वेळेत कीर्तन संपन्न होईल.


श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट, फलटण यांच्या वतीने या सर्व धार्मिक सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले असून, फलटणकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!