फलटण टुडे वृत्तसर्व (फलटण दि.22 नोव्हेंबर 2026) : –
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध वृत्तपत्रे, वृत्तसंस्था आणि प्रकाशन संस्थांकडून दरवर्षी दिनदर्शिकांचे प्रकाशन केले जाते. या दिनदर्शिकांमध्ये महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी तसेच ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या दिवसांची नोंद करण्यात येते. मात्र, मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी संबंधित तीन महत्त्वाच्या दिवसांची नोंद करताना अचूकता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व दिनदर्शिका प्रकाशकांनी या तीन दिवसांचा योग्य उल्लेख करावा, असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष तथा आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारक प्रकल्पाचे प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी केले आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात बेडकिहाळ यांनी नमूद केले आहे की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची 20 फेब्रुवारी रोजी जयंती, तर 17 मे रोजी पुण्यतिथी असते. तसेच 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 6 जानेवारी हा दिवस राज्यात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे हे तीनही दिवस मराठी पत्रकारिता आणि वृत्तपत्रसृष्टीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. मात्र, अनेकदा 6 जानेवारी या दिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असल्याचा चुकीचा उल्लेख काही ठिकाणी केला जातो. वास्तविक, 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिन नसून त्यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरू केल्याचा ऐतिहासिक दिवस आहे. त्यामुळे ही चूक टाळून दिनदर्शिकांमध्ये योग्य माहिती प्रसिद्ध होणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून या विषयाचा राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून शासनाकडून जाहीर करण्यात येणार्या महापुरुषांच्या जयंती अभिवादन यादीमध्ये 20 फेब्रुवारी या दिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीचा समावेश करून घेण्यात आला. त्यानुसार प्रतिवर्षी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात येते, ही समाधानाची बाब आहे. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व वृत्तपत्रे, वृत्तसंस्था, प्रकाशन संस्था आणि दिनदर्शिका प्रकाशित करणार्या संस्थांनी आपल्या दिनदर्शिकांमध्ये 20 फेब्रुवारी – आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती, 17 मे – आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुण्यतिथी आणि 6 जानेवारी – मराठी पत्रकार दिन (दर्पण दिन) अशा अचूक नोंदी कराव्यात. मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील या महत्त्वपूर्ण योगदानाची योग्य माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ही दक्षता घेणे आवश्यक आहे, असे आवाहन रविंद्र बेडकिहाळ यांनी केले आहे.

