रोबोटिक्सच्या क्षेत्रात फलटणचा डंका! फलटण एज्युकेशन सोसायटीच्या पाच विद्यार्थ्यांची दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

रोबोटेक्स इंडिया नॅशनल स्पर्धेत चार शाळांमधील विद्यार्थ्यांचे यश; आंतरराष्ट्रीय स्तरावर फलटणचे नाव उज्ज्वल करण्याची संधी

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २५ नोव्हेंबर २०२६):-

  
विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत फलटणच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढविला आहे. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या चार शाळांमधील एकूण पाच विद्यार्थ्यांची सेवुल, दक्षिण कोरिया येथे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित 'रोबोटेक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा २०२६' साठी निवड झाली आहे. रोबोटेक्स इंडिया नॅशनल स्पर्धा २०२६ मध्ये 'Entrepreneurship Against 2026' या कॅटेगरीत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे विद्यार्थ्यांना ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी प्राप्त झाली आहे.
 जागतिक स्तरावर दरवर्षी रोबोटेक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमध्ये जगातील ५६ विविध देशांतील विद्यार्थी रोबोटिक्समधील आपल्या कल्पकता, तांत्रिक ज्ञान, संशोधनवृत्ती आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण करतात. यापूर्वी एस्टोनिया येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सन २०२६ मध्ये सेवुल, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतातून निवड होणे ही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे.


रोबोटेक्स इंडिया नॅशनल स्पर्धा २०२६ मधून फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अनुक्रमे श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश (सीबीएसई) स्कूल – १ विद्यार्थी, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (एसएससी) – १ विद्यार्थी, मुधोजी हायस्कूल – १ विद्यार्थी, श्रीमंत सगुणामाता माध्यमिक विद्यालय, दालवडी – २ विद्यार्थी अशा प्रकारे संस्थेच्या चार शाळांमधील एकूण पाच विद्यार्थ्यांची सेवुल, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या रोबोटेक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे स्वरूप, सहभागाची प्रक्रिया, स्पर्धेची तयारी आणि पुढील नियोजन याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी रोबोटेक्स इंडिया संस्थेच्या ऑपरेशन्स हेड सौ. मनीषा सावंत यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधून स्पर्धेसंदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनातील विविध शंकांचे निरसन करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आत्मविश्वासाने सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. याप्रसंगी रोबोटेक्स इंडिया संस्थेचे श्री. आकाश साळुंखे, श्री. ऋतुराज पवार, कुमारी वैष्णवी तोरसकर, कुमारी तृप्ती खवळे आणि श्री. आकाश पवार यांनीही निवड झालेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या पुढील तयारीबाबत मार्गदर्शन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आजच्या डिजिटल आणि तंत्रज्ञानप्रधान युगात रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवसंशोधन आणि उद्योजकता या क्षेत्रांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता, समस्या निराकरण क्षमता, संशोधनवृत्ती आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहेत. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मिळविलेली निवड ही संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाची पावती आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, मा. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक, फलटण नगर परिषद, मा. श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती, फलटणचे माजी सभापती, मा. श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, महाविद्यालयीन समितीचे सदस्य आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मा. श्री. अरविंद निकम यांनी निवड झालेल्या सर्व पाच विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व प्रशासनाचे अभिनंदन केले.
सेवुल, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून फलटण एज्युकेशन सोसायटीसह फलटणचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या. राष्ट्रीय स्तरावरील यशानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी सज्ज झालेल्या या पाच विद्यार्थ्यांच्या यशामुळे फलटणच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!