फलटणमध्ये २ डिसेंबरपासून भव्य ‘श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२६’; शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या संधींची पर्वणी!

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, उत्तम बियाणे, सूक्ष्म सिंचन, शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता, पशुपालन व दुग्धव्यवसायाचे मिळणार मार्गदर्शन; २ ते ६ डिसेंबरदरम्यान आयोजन

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २५ नोव्हेंबर २०२६):-

 शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता, नाविन्यपूर्ण प्रयोग,  आणि कृषी व्यवसायातील नवीन संधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण, महाराष्ट्र शासन कृषि विभाग,  युटीलिटी इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ ते ६ डिसेंबर २०२६ या कालावधीत भव्य 'श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२६' आयोजित करण्यात आले आहे. 'नवीन तंत्रज्ञान, नवीन संधी, शेतकऱ्यांसाठी एक व्यासपीठ!' ही संकल्पना घेऊन आयोजित करण्यात आलेले हे कृषि प्रदर्शन शेतकरी बांधवांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्याची आणि कृषी क्षेत्रातील नवनवीन संधी जाणून घेण्याची पर्वणी ठरणार आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवी अर्थात प्लॅटिनम ज्युबिली वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील प्रगती, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा संदेश दिला जाणार आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे, कृषि उत्पादनाची गुणवत्ता व उत्पादकता वाढविणे तसेच शेतीला पूरक व्यवसायांची जोड देणे या दृष्टीने हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रदर्शनामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञान, उत्तम बियाणे व सुधारित वाण, सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान,शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता, पशुपालन व दुग्धव्यवसाय तसेच कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन अशा विविध विषयांवर आधारित विशेष दालने व माहिती उपलब्ध होणार आहे. आधुनिक कृषी यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक कार्यक्षम कशी करता येईल, सुधारित बियाण्यांच्या वापरातून पीक उत्पादनात सुधारणा कशी साधता येईल, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब कसा करावा, याबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळणार आहे.


आज शेतीसमोरील पाणीटंचाई, वाढता उत्पादन खर्च, मजुरांची कमतरता आणि बदलत्या हवामानाची आव्हाने लक्षात घेता आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर सूक्ष्म सिंचन, आधुनिक कृषी यंत्रे आणि सुधारित पीक उत्पादन तंत्रज्ञान यांची माहिती शेतकऱ्यांना एकाच व्यासपीठावर मिळणे उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर पशुपालन आणि दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून शेतीला पूरक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याबाबतही मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय न राहता आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य, नियोजन आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांच्या आधारे आर्थिक समृद्धी साधण्याचे प्रभावी माध्यम बनावे, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील बदलत्या संधींची माहिती मिळवून देणे, कृषी क्षेत्रातील विविध घटकांना एकत्र आणणे आणि आधुनिक शेतीच्या दिशेने सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हा या उपक्रमामागील महत्त्वाचा हेतू आहे.
फलटण व परिसरातील शेतकरी, युवा शेतकरी, कृषी उद्योजक, महिला शेतकरी, विद्यार्थी तसेच कृषी क्षेत्रात रुची असणाऱ्या नागरिकांसाठी हे प्रदर्शन विशेष उपयुक्त ठरणार आहे. कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता जाणून घेण्यासाठी, शेतीविषयक माहिती मिळविण्यासाठी आणि कृषी व्यवसायातील नव्या संधींचा वेध घेण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल.
'चला, शेती समृद्धीच्या दिशेने!' या प्रेरणादायी संदेशासह आयोजित करण्यात आलेले श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन दि. २ ते ६ डिसेंबर २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. कृषि प्रदर्शनाचे ठिकाण श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल, शेतीशाळा परिसर, जिंती नाका, फलटण, जिल्हा सातारा असे आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित या कृषी प्रदर्शनाला शेतकरी बांधव, कृषीप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाची ओळख, शेतीतील नव्या संधींचा शोध आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा ध्यास घेऊन आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२६ हे फलटणच्या कृषी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पर्व ठरणार आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!