
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २५ एप्रिल ३०२६):- संपूर्ण भारतामध्ये जनगणना २०२७ च्या प्रक्रियेत यंदा पहिल्यांदाच स्वयंजनगणना आणि डिजीटल जनगणना ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. फलटण तालुक्यात या उपक्रमासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. यंदाची जनगणना ही दोन टप्प्यात होणार असून येत्या मे-जुन २०२६ मध्ये घरगणना व संसाधन गणना होणार असून पुढील वर्षीच्या टप्प्यात नागरिकांचे सामाजिक, आर्थिक व लोकसंख्या विषयक तपशील नोंदविले जाणार आहेत. जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी संतोष पाटील व उपविभागीय अधिकारी श्रीम. प्रियांका आंबेकर यांनी नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे जाहीर आवाहन केले आहे.

दि. १ मे २०२६ ते दि. १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती भरता येणार आहे. या पद्धतीमुळे नागरिकांचा आणि प्रगणकांचा वेळ वाचणार असून माहिती अधिक अचूकपणे नोंदवली जाणार आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रवाह-आरेखानुसार (फ्लोचार्ट) नागरिकांनी पुढील टप्प्यांनुसार प्रक्रिया पूर्ण करायची आहे. सुरुवातीला अधिकृत संकेतस्थळावर प्रवेश करून राज्य निवडून नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावी लागेल. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव, दहा अंकी मोबाइल क्रमांक व ई-मेल पर्यायी नमूद करावा लागेल. नोंदणीनंतर मोबाइलवर येणाऱ्या ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करून पसंतीची भाषा निवडावी लागेल. यानंतर जिल्हा, पिनकोड, गाव किंवा परिसराची माहिती भरून नकाशावर स्वतःचे अचूक निवासस्थान निश्चित करावे लागेल. पुढील टप्प्यात घर व कुटुंबाशी संबंधित सविस्तर प्रश्नावली (एकूण ३३ प्रश्न ) भरून माहिती सादर करायची आहे. अंतिम सादरीकरणापूर्वी (फायनल सबमिशन) माहिती तपासण्याची सुविधा उपलब्ध असून एकदा अंतिम सादरीकरण केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.

माहिती सादर केल्यानंतर नागरिकांना स्वयं-जनगणना ओळख क्रमांक (एस.ई. आयडी) प्रदान केला जाईल. जनगणना कर्मचारी यांचे दि.१६ मे ते १५ जून दरम्यान होणा-या घरभेटीवेळी हा आयडी सादर करणे आवश्यक राहणार आहे. स्वयं-जनगणना ही प्रक्रिया सोपी, सुरक्षित आणि वेळ वाचवणारी असल्याने फलटण तालुक्यातील नागरिकांनी १ मे ते १५ मे या कालावधीत स्वतःहून आपली माहिती भरून सहकार्य करावे, जेणेकरून जनगणना प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि अचूक होईल.

फलटण तालुक्यात जनगणना प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी घर यादी प्रगणक गट-४७१, प्रगणक ४६८, राखीव प्रगणक ४७, पर्यवेक्षक ५८ व राखीव पर्यवेक्षक ६, आणि क्षेत्रिय प्रशिक्षक (फील्ड ट्रेनर) ८ यांची नेमणूक केली आहे.
जनगणना प्रक्रियेत अचूकता व सुसूत्रता राखण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय फलटण येथे दि. २४ एप्रिल २०२६ ते २६ एप्रिल २०२६, दि. २७ एप्रिल २०२६ ते २९ एप्रिल २०२६, दि. ०२ मे २०२६ ते ०४ मे २०२६ या प्रमाणे प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे. या प्रशिक्षणात ऑनलाइन प्रणालीचा वापर, माहिती संकलन पद्धती, नागरिकांशी संवाद कौशल्य याबाबत सखोल मार्गदर्शन दिले जात आहे.

प्रगणकांकडून गोळा केली जाणारी माहिती देखील यावेळी प्रथमच मोबाईल अॅपव्दारे गोळा केली जाणार आहे. जनगणना कायदा कलम १५ प्रमाणे जनगणनेशी संबंधित सर्व माहिती गोपनीय असून ती माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत देता येत नाही अथवा एखाद्या न्यायालयात पुरावा म्हणुन वापरता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी खरी व अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देखील करणेत येत आहे.



