फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ४ मे २०२६):-
महाराष्ट्र ही संत, विचारवंत आणि देशाला दिशा देणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांची भूमी असून, या समृद्ध वारशाचे जतन करणे ही आजची मोठी गरज आहे. मात्र अलीकडच्या काळात इतिहासाचे विकृतीकरण आणि पर्यावरणाचा वाढता ऱ्हास या दोन गंभीर समस्या समाजासमोर उभ्या ठाकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यकर्त्यांनी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचा ठाम सूर फलटण येथे झालेल्या ३८ व्या साहित्यिक संवाद कार्यक्रमात उमटला.
साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन आणि वन विभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात साहित्यिकांनी आपली खंत व्यक्त केली. इतिहास सांगताना अभ्यास आणि जबाबदारी आवश्यक असून, कोणत्याही थोर युगपुरुषांचा अवमान होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
तसेच वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वृक्षतोडीचे प्रमाण चिंताजनक असून, “दिवसाढवळ्या झाडांची कत्तल” होत असल्याबद्दल उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने आपापल्या स्तरावर योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
फलटणच्या साहित्यिक संवादाच्या माध्यमातून इतिहास संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. समाज परिवर्तनाच्या नावाखाली इतिहासाची तोडफोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणे योग्य आहे का, याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक असल्याचेही मत मांडण्यात आले.
कार्यक्रमात प्राचार्य रवींद्र येवले, संयोजक ताराचंद्र आवळे, पर्यावरणप्रेमी सुधीर इंगळे, सचिन जाधव, महादेवराव गुंजवटे, प्रा विकास शिंदे, प्रमोद सस्ते, ॲड. रोहिणी भंडलकर, श्रेयस कांबळे, अतुल चव्हाण, अविनाश चव्हाण यांनी आपली मते मांडली.
यावेळी ताराचंद्र आवळे संपादित ‘युवा स्पंदन’ या स्मरणिकेचे तसेच प्रा. विक्रम आपटे लिखित ‘प्रभाव’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रा. विक्रम आपटे, विनायकराव ननावरे, अतुल चव्हाण ,शुभम रणदिवे, विक्रम भांडवलकर, आप्पासाहेब तांबे, सविता तांबे, योगेश गंगतीरे, मयूर शेरखाने, गणेश गुळवे, राजकुमार काकडे, अमोल जाधव, सचिन भांडवलकर यांच्यासह फलटण तालुक्यातील साहित्यिक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

