इ.12 वी नंतर जीवशास्त्र विषयातील अमर्याद संधी : मुधोजी हायस्कूलमध्ये करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि. २३ जुलै२०२६) : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे व्यवसाय मार्गदर्शन विभाग व जीवशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ११ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बारावीनंतर जीवशास्त्र विषयातील अमर्याद संधी’ या विषयावरील करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका सौ. व्ही. आर. लोणकर या होत्या. एन. पी. रणवरे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करून विद्यार्थ्यांना करिअर नियोजनाचे महत्त्व पटवून दिले. एम. डी. ढावरे यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जीवशास्त्र विभागप्रमुख श्री. नेवसे सर यांनी अत्यंत सुयोग्य व नियोजनबद्ध पद्धतीने केले. त्यांच्या प्रभावी नियोजनामुळे कार्यक्रमाचे सर्व टप्पे सुरळीत पार पडून विद्यार्थ्यांना दर्जेदार करिअर मार्गदर्शनाचा लाभ मिळाला.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक के. एन. कांबळे यांनी बारावीनंतर जीवशास्त्र विषयाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी वैद्यकीय, निमवैद्यकीय, जैवतंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी), कृषी, सूक्ष्मजीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र, संशोधन तसेच अन्य उदयोन्मुख क्षेत्रांतील शिक्षण व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. विविध अभ्यासक्रमांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, प्रवेश प्रक्रिया, भविष्यातील रोजगाराच्या संधी आणि करिअरच्या विविध वाटांचा त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल परिचय करून दिला.

मार्गदर्शन सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना बारावीनंतर उपलब्ध असलेल्या करिअरच्या असंख्य पर्यायांची माहिती मिळाली आणि योग्य करिअर निवडीसाठी प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमाचा समारोप एस. डी. तावरे यांनी आभार प्रदर्शनाने केला. या कार्यक्रमास शिक्षकवृंद तसेच इयत्ता ११ वी विज्ञान शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!