फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि. २३ जुलै २०२६) :
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे व्यवसाय मार्गदर्शन विभाग व जीवशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ११ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बारावीनंतर जीवशास्त्र विषयातील अमर्याद संधी’ या विषयावरील करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक के. एन. कांबळे होते तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका सौ. व्ही. आर. लोणकर, ज्येष्ठ शिक्षक एम. डी. ढावरे हे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत जीवशास्त्र विभागप्रमुख श्री. अभिषेक नेवसे यांनी गुलाब पुष्प देऊन केले.

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक के. एन. कांबळे यांनी बारावीनंतर जीवशास्त्र विषयाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी वैद्यकीय, निमवैद्यकीय, जैवतंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी), कृषी, सूक्ष्मजीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र, संशोधन तसेच अन्य उदयोन्मुख क्षेत्रांतील शिक्षण व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. विविध अभ्यासक्रमांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, प्रवेश प्रक्रिया, भविष्यातील रोजगाराच्या संधी आणि करिअरच्या विविध वाटांचा त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल परिचय करून दिला.

यावेळी मार्गदर्शन सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना बारावीनंतर उपलब्ध असलेल्या करिअरच्या असंख्य पर्यायांची माहिती मिळाली आणि योग्य करिअर निवडीसाठी प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. पी. रणवरे यांनी केले तर आभार एस. डी. तावरे यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षकवृंद तसेच इयत्ता ११ वी विज्ञान शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


