फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण: ढवळ (ता. फलटण,दि २८ ऑगस्ट २०२६):-
येथील शेरेचीवाडी येथे नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती ‘शेतकरी दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात फलटणचे मंडळ कृषी अधिकारी अजित जगताप यांनी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कृषी व सहकार क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेती अधिक उत्पादनक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. विशेषतः कृषी यांत्रिकीकरण आणि ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने’बाबत (PMFME) सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी उत्पादन, प्रक्रिया, पॅकिंग, ब्रँडिंग आणि बाजारपेठ व्यवस्थापनावर भर द्यावा, असे अजित जगताप यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन सहाय्यक कृषी अधिकारी योगेश भोंगळे यांनी केले.
कार्यक्रमास फलटणचे उप कृषी अधिकारी दत्तात्रय राऊत यांच्यासह महेश चव्हाण, संजय मोहिते, विठ्ठल मोहिते, अरुण चव्हाण, किसन शिंदे, हणमंत मोहिते, हिंदुराव मोहिते, अंकुश डांगे, भानुदास मोहिते, बाळकृष्ण मोहिते, प्रकाश शिंदे, शिवाजी फडतरे, दीपक मोहिते, चंद्रकांत चव्हाण, दिनकर चव्हाण आणि परिसरातील प्रगतीशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी दिनानिमित्त उपस्थितांनी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी महेश चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शेरेचीवाडी येथे ‘शेतकरी दिन’ उत्साहात साजरा; कृषी योजना व अन्नप्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन

