माण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंचा डंका; अनेक विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड

फलटण टुडे वृत्तसेवा (म्हसवड , दि ६ ऑक्टोबर २०२६):-
माणदेशी चॅम्पियन्स फाऊंडेशन, म्हसवड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या माण तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत स्थानिक सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या गटात शाळेच्या धावपटूंनी व मैदानी खेळाडूंनी वर्चस्व गाजवत अनेक पदकांची लयलूट केली असून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची सातारा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


या स्पर्धेत अनिश सरतापे याने अफलातून वेगाचे प्रदर्शन करत १०० मी. व २०० मी. धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच संतोष विरकर याने लांब पल्ल्याच्या ५००० मी. धावण्यात प्रथम, तर ३००० मी. स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. ८०० मी. धावण्यात महेश खांडेकर याने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. अष्टपैलू खेळाडू संग्राम खांडेकर याने ४०० मी. धावणे व थाळीफेक या दोन्ही प्रकारांत द्वितीय क्रमांक मिळवला, तर आशिष नरळे याने १५०० मी. धावण्यात द्वितीय क्रमांक मिळवला. याशिवाय अमर माने (१५०० मी. धावणे – तृतीय) आणि तेजस सोनवणे (गोळाफेक – तृतीय) यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.
सांघिक रिले शर्यतीतही दबदबा


वैयक्तिक कौशल्यासोबतच सांघिक प्रकारातही सिद्धनाथच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. ४×१०० मी. रिले शर्यतीत अनिश सरतापे, आशिष नरळे, महेश खांडेकर, संग्राम खांडेकर व विशाल नरळे यांच्या संघाने सुवर्णपदक (प्रथम क्रमांक) पटकावले. तसेच ४×४०० मी. रिले शर्यतीत धीरज झिमल, अमर माने, तेजस सोनवणे, संतोष विरकर व संग्राम खांडेकर यांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.


स्पर्धेत अव्वल कामगिरी करून सातारा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व विजेत्या खेळाडूंचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि म्हसवड परिसरातील क्रीडाप्रेमींकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!