डोर्लेवाडीत बैलपोळ्याचा आनंदोत्सव; ‘चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या ५०५०’ सह बनकर परिवाराच्या शर्यतीच्या बैलांचे जंगी स्वागत

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १२ ऑक्टोबर २०२६): –
सालाबादप्रमाणे याही वर्षी बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावी पारंपरिक बैलपोळ्याचा सण अत्यंत उत्साहात, जल्लोषात आणि भव्य-दिव्य वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेणारा आणि शर्यतप्रेमींच्या अंगावर शहारे आणणारा हा सोहळा डोर्लेवाडी येथील प्रसिद्ध गाडामालक बनकर परिवाराच्या गोट्यावर पार पडला.

जयेश पाटील यांच्या मालकीचा बिनजोडचा ख्यातनाम बादशाह आणि ‘चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या ५०५०’ या अव्वल दर्जाच्या शर्यती बैलाचे बनकर परिवाराच्या गोट्यावर अत्यंत थाटामाटात व जंगी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा दणदणाट, शर्यतप्रेमींचा जल्लोष आणि पारंपरिक परंपरेच्या साक्षीत डोर्लेवाडी परिसरात बैलपोळ्याचा सण मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
बनकर परिवाराच्या वतीने आयोजित या खास सोहळ्यात केवळ पाहुणे बैलच नव्हे, तर त्यांच्या घरच्या छाव्यांचाही मोठा थाट पाहायला मिळाला. महाराष्ट्रभर आपल्या वेगाची आणि ताकदीची छाप पाडणाऱ्या बलमा, डिफेंडर, चॉकलेट आणि फायटर या बनकर परिवाराच्या लाडक्या घरच्या बैलांचा पोळा अत्यंत आकर्षक पद्धतीने साजरा करण्यात आला. बैलांना रंगीबेरंगी झुली, बाशिंगे आणि विविध अलंकारांनी सजवून त्यांची गोट्यावर तसेच परिसरात दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. आपापल्या क्षेत्रात नाव गाजवलेल्या या शर्यती बैलांना पाहण्यासाठी डोर्लेवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांसह अनेक नामांकित गाडामालकांनी गोट्यावर तुफान गर्दी केली होती.


बैलपोळा हा केवळ सण नसून शेतीची धुरा सांभाळणाऱ्या आणि मैदानावर धुमाकूळ घालणाऱ्या सर्जा-राजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे, हाच संदेश या सोहळ्यातून पाहायला मिळाला. प्रसिद्ध गाडामालक अजितशेठ बनकर, रमेशशेठ बनकर आणि शुभमशेठ बनकर यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आणि आदरातिथ्यामुळे हा पोळा संपूर्ण बारामती तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. परंपरेचे जतन करत शर्यतीचा वारसा पुढे नेणाऱ्या या सर्व बैलांचे पूजन करून गोट्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बनकर परिवाराच्या या स्तुत्य उपक्रमामुळे डोर्लेवाडीतील बैलपोळ्याच्या उत्साहाला एक वेगळीच झळाळी मिळाली असून, सर्व स्तरातून बनकर परिवाराचे कौतुक केले जात आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!