
फलटण टुडे वृत्तसेवा (कोलंबो,दि 15 फेब्रुवारी 2026):- 2026 च्या टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक हाय-व्होल्टेज सामना खेळला गेला. भारत आणि पाकिस्तान हा सामना कोलंबोमध्ये खेळला गेला. पाकिस्तानला 176 धावांचे लक्ष्य दिले होते. पाकिस्तान 114 धावात गारद झाला आणि भारताने हा सामना 61 धावांनी जिंकला.
टीम इंडियाने पाकिस्तानचा सहज 61 धावांनी पराभव केला. या शानदार विजयासह टीम इंडिया सुपर 8 साठी पात्र ठरली. या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 18 षटकांत फक्त 114 धावा करता आल्या.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची या सामन्यात चांगली सुरुवात झाली नाही. अभिषेक शर्मा पहिल्याच षटकात धाव न घेता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि इशान किशनने डावाची सूत्रे हाती घेतली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. इशानने 40 चेंडूत 77 धावांची तुफानी खेळी केली. इशान बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा डाव डळमळीत झाला. सूर्यकुमार यादवने 32 धावा केल्या, तर तिलक वर्माने 25 आणि शिवम दुबेने 27 धावांचे योगदान दिले. इशानच्या अर्धशतकामुळे टीम इंडिया 175 धावांपर्यंत पोहोचू शकली. पाकिस्तानकडून सॅम अयुबने सर्वाधिक 3 बळी घेतले.

एकाही पाकिस्तानी फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. साहिबजादा फरहान खाते न उघडता बाद झाला. सॅम अयुबने 6 सलमान आघाने 4 आणि बाबर आझमने 5 धावा केल्या. 13 धावांवर 3 बळी गमावल्यानंतर पाकिस्तान अडचणीत सापडला. त्यानंतर बाबर आझम 34 धावांवर बाद झाल्याने पाकिस्तानला चौथा धक्का बसला. त्यानंतर उस्मान खान आणि शादाब खान यांनी पाचव्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. उस्मानने 34 चेंडूत 44 धावा केल्या. दरम्यान, शादाब खानने 15 चेंडूत 14 धावा केल्या. पाकिस्तानच्या फक्त चार फलंदाजांनी दुहेरी आकडी धावसंख्या गाठली. टीम इंडियाकडून हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत नऊ सामने झाले आहेत. त्यापैकी आठ सामने टीम इंडियाने जिंकले आहेत, तर एकदा पाकिस्तानने जिंकले आहे. या विजयासह टीम इंडियाने या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

