फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण , दि १३ जुलै २०२६):-
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते मा श्री प्रताप सरनाईक यांनी फलटण एसटी आगाराला भेट देऊन आगाराच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी या भेटीवेळी शिवसेनेचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या विविध मागणीला प्रतिसाद देत फलटण बसस्थानक विकसित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

या विकास प्रकल्पांतर्गत आधुनिक प्रवासी सुविधा, प्रशस्त प्रतीक्षालय, व्यापारी गाळे, पार्किंग, स्वच्छतागृहे, डिजिटल माहिती प्रणाली तसेच इतर अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त बसस्थानक उभारण्यात येणार आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलमुळे एसटी महामंडळाला नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल, तर प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सेवा मिळणार आहे. या प्रकल्पातून स्थानिक युवकांसाठी रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधीही निर्माण होणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. फलटण आगाराला एकूण २५ नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५ बसेस, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी १० बसेस देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फलटण तालुक्यातील वाढती प्रवासी संख्या आणि ग्रामीण भागातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन एसटी सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. नवीन बसेस उपलब्ध झाल्यानंतर प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर सेवा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी फलटण बसस्थानकाच्या सुविधा, स्वच्छता, बैठकीची व्यवस्था तसेच आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच आगारातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आगाराच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. एसटी महामंडळाची सेवा अधिक सक्षम व प्रवासीकेंद्रित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली

भेटीदरम्यान सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवसेना नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, जिल्हा परिषदेचे सदस्य गिरीश बनकर. दत्ता बापू अनपट,दत्तात्रय गुंजवटे, नगरसेवक विकास काकडे, विशाल तेली तसेच आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

