प्रा. अशोक शिंदे लिखित “गाव पांढरीच्या वैभवखूणा” या ललित ग्रंथास राज्यस्तरीय ‘अक्षर गौरव’ पुरस्कार जाहीर

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २१ ऑगस्ट २०२६):-     मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे यांच्या ‘गाव पांढरीच्या वैभवखूणा’ या ललितसंग्रहाची सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय यांच्यावतीने कै. भास्कराव माने यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या “राज्यस्तरीय अक्षरगौरव पुरस्कारासाठी निवड झाली असल्याचे अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने यांनी पत्राद्वारे नुकतेच कळविले आहे.  गेल्या १४ वर्षापासून राज्यस्तरीय “अक्षर गौरव साहित्य पुरस्कार”, “अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार” व “अक्षर गौरव साहित्य प्रेरणा पुरस्कार” अशा विविध साहित्य पुरस्कारांचे अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय, सातारा यांच्यावतीने आयोजन करण्यात येत आहे. या पुरस्कारांतर्गत सातारा जिल्हा लेखकांसाठी दिल्या जाणाऱ्या “अक्षर गौरव साहित्य प्रेरणा पुरस्कार-२०२५ करीता डॉ. अशोक शिंदे यांच्या या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. रविवार दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी सातारा येथे मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी व गझलकार धनंजय तडवळकर यांच्या प्रमुख उपस्थित व कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार असल्याचे समारंभाचे संयोजक व संस्थेचे संस्थापक रवींद्र भारती यांनी सांगितले आहे. 
प्रा. डॉ. शिंदे यांच्या या ग्रंथास हा चौथा पुरस्कार प्राप्त झाला असून; यापूर्वी या ग्रंथास शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांचा ‘शिविम साहित्य पुरस्कार - २०२५’, अँग्रो न्यूज परिवार ट्रस्ट, फलटण यांचा ‘छत्रपती संभाजी महाराज साहित्य सेवा पुरस्कार - २०२५’ व शिवाबाबा वाघ स्मृती प्रतिष्ठान, नाशिक यांचा ‘शिवाजी शहादू वाघ स्मृती पुरस्कार - २०२५’ हे राज्यस्तरीय तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
‘गाव पांढरीच्या वैभवखुणा’ हा ललित लेखांचा संग्रह लोकजीवानातील साधनांचे ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक दर्शन घडवणारा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून कृषी व ग्रामीण जीवनातील नामशेष होत चाललेल्या साधनांचे मोल लेखक शिंदे यांनी अधोरेखित केले आहे. एकूण अठरा ललित लेख असलेल्या या ग्रंथात भारतीय कृषी व ग्रामीण संस्कृतीतील प्रमुख साधनांचे प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंतचे लोकवैभव लेखकाने ललितरम्य भाषेत शब्दबद्ध केलेले आहे. या ग्रंथामधील नांगर, मोट, पोहरा, कावड, जाते, करंडा, काठवट, माळा, वावडी, कणगी, गंज, चोपणी, सूप, कंदील, अडकित्ता, बाज, गोधडी आणि आगळ ही गाव - शिवारातील परंपरागत साधने लोकसंस्कृतीची महती सांगतात. ही साधने आज काळाच्या ओघात विस्मृतीत जात आहेत. ही साधने म्हणजे केवळ वापरायच्या वस्तू नसून ही साधने म्हणजे आपल्या संस्कृतीचा अमूल्य व जिवंत वारसा होता. या साधनांशी मानवाचे केवळ व्यावहारिक नाते नव्हते तर त्यांच्याशी एक भावनिक बंध देखील निर्माण झालेला होता. आज बदलत्या काळात व आधुनिक माहिती तंत्रज्ञान तथा डिजिटल क्रांतीच्या युगात वापरात नसलेल्या व विस्मृतीत जाऊ पाहणाऱ्या या साधनांचे रूप, वापर, महत्व व उपयोगिता व त्यांची आजच्या काळातील उणीव या ग्रंथाच्या रूपाने लेखकाने साकारली आहे. म्हणूनच या ग्रंथात ग्रामीण व कृषी संस्कृतीचे सजीव दर्शन घडते आणि ग्रामीण लोकजीवनाच्या समृद्ध वैभवखुणा चित्रित झालेल्या दिसतात.
या ग्रंथात सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची गाव- शेती चित्रित झाली असल्याने तत्कालीन व नववाचक, समीक्षक व परीक्षक यांच्या पसंतीला हा ग्रंथ उतरत आहे. लेखक अशोक शिंदे यांच्या या ग्रंथास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ मराठी साहित्यिक तथा समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना तर मराठी साहित्यिक व प्रसिद्ध व्याख्याते डॉ. यशवंत पाटणे यांची पाठराखण लाभली आहे.
या पुरस्काराबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी गव्हर्निग कौन्सिल चेअरमन, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रा. डॉ. शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम व सर्व सहकारी शिक्षक याशिवाय इतर अनेक मान्यवरांनी लेखक प्रा. डॉ. अशोक शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!