महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव इनडोअर क्रिकेट असोसिएशन आयोजित

१५ वर्षांखालील मुलांमध्ये जळगावला अजिंक्यपद तर ठाण्याला उपविजेतेपद

१७ वर्षांखालील मुलांमध्ये नागपूरला विजेतेपद तर बीडला उपविजेतेपद

तर १३ वर्षांखालील गटात जळगावला विजेतेपद तर साताऱ्याला उपविजेतेपद

फलटण टुडे वृत्तसेवा (जळगाव दि २० ऑगस्ट २०२६)::- घरच्या मैदानावर जळगावच्या युवा खेळाडूंनी अक्षरशः धुमाकूळ घालत १५ आणि १३ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपदावर नाव कोरले, तर १७ वर्षांखालील गटात नागपूरने बीडचा पराभव करून विजेतेपदावर मोहोर उमटवली. महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आणि जळगाव इनडोअर क्रिकेट असोसिएशनच्या दमदार आयोजनातून रंगलेल्या जुनिअर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी इनडोअर क्रिकेट स्पर्धेचा समारोप युवा खेळाडूंच्या शानदार कामगिरीने झाला. जळगाव, नागपूर, ठाणे, बीड आणि सातारा या संघांनी अंतिम फेरीपर्यंत झुंज देत महाराष्ट्राच्या युवा इनडोअर क्रिकेटमधील ताकद दाखवून दिली.

Screenshot

१५ वर्षांखालील गटात जळगावचा दणदणीत झेंडा
यजमान जळगावने ठाण्याचा ७९-२३ असा तब्बल ५६ धावांनी धुव्वा उडवत १५ वर्षांखालील मुलांच्या गटाचे अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात जळगावच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत ठाण्यावर दबाव निर्माण केला आणि सामना हातातून निसटू दिला नाही. युगेंद्र भोळेने १९ धावा, स्मितेश शिंदेने १५ धावा व २ बळी, कार्तिक राजपालने १७ धावा व ३ बळी, तर अंश चौधरीने १२ धावा व १ बळी घेत जळगावच्या दणदणीत विजयात मोलाचा वाटा उचलला. ठाण्याकडून सौरव सुमनने १८ धावा, तर भाविक पवारने ९ धावा करत प्रतिकार केला; मात्र जळगावच्या भेदक खेळासमोर त्यांचा प्रतिकार अपुरा ठरला आणि ठाण्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

१७ वर्षांखालील गटात नागपूरचा धावांचा ‘धडाका’
१७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात नागपूरने बीडचा ११८-७४ असा ४४ धावांनी पराभव करत अजिंक्यपदावर कब्जा केला. नागपूरने या सामन्यात तब्बल ११८ धावा फटकावत स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. या भक्कम धावसंख्येने नागपूरच्या विजयाचा पाया पहिल्याच डावात मजबूत केला. नागपूरच्या पहिल्या जोडीनेच (नैतिक गंगवानी-तुफेल) सामन्याचा नूर बदलून टाकला. नैतिक गंगवानीने २९ धावा, तर तुफेल खानने १३ धावा करत तब्बल ४२ धावांची भागीदारी उभारत संघाला मजबूत स्थितीत नेले. त्यानंतर नैतिक बालाने २२ धावा, तर चरित बाविस्करने ९ धावा करत नागपूरच्या मोठ्या धावसंख्येला हातभार लावला. या आक्रमक फलंदाजीसमोर बीडला सुरुवातीपासूनच मोठे आव्हान उभे राहिले. बीडकडून इशांतने २० धावा, वेदांत मुंडेने ११ धावा, विराट चंदनेने ८ धावा करत सामना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागपूरच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बीडला अपेक्षित वेग राखता आला नाही. परिणामी ७४ धावांवर त्यांचा डाव थांबला आणि नागपूरने ४४ धावांनी दणदणीत विजय मिळवत विजेतेपदाचा चषक उंचावला.

१३ वर्षांखालील गटात जळगावचा पुन्हा जल्लोष
१३ वर्षांखालील मुलांच्या अंतिम लढतीतही यजमान जळगावने साताऱ्याचा ४६ धावांनी धुव्वा उडवत विजेतेपद पटकावले. घरच्या मैदानाचा पुरेपूर फायदा उठवत जळगावच्या युवा खेळाडूंनी सामन्यावर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. दृविथ माळकरने २१ धावा व २ बळी घेत अष्टपैलू कामगिरी करत विजयाचा पाया मजबूत केला. त्याला वंश राजपालने ६ धावा करत चांगली साथ दिली. साताऱ्याकडून विराज आणि विनीत यांनी जिद्दीने सामना लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र जळगावच्या अचूक खेळासमोर त्यांना विजयापर्यंत मजल मारता आली नाही. अखेर साताऱ्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

तसेच निवड चाचणी साठी आलेल्या सर्व विविध गटातील व जिल्ह्यातील मुलींनी सुध्दा उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

जळगाव इनडोअर क्रिकेट असोसिएशनच्या आयोजनाला दाद
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार चंद्रकात सोनावणे (चोपडा), दिलीप दिघे (जिल्हा क्रीडा अधिकारी), विनोद चौधरी (व्यावसायिक) यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक चेअरमन क्षितीज वेदक आणि संस्थापक सरचिटणीस बाळासाहेब (बाळ) तोरसकर, यांच्यासोबत राजेंद्र इखनकर, जळगाव इनडोअर क्रिकेट असोसिएशनचे दीपक आर्डे, देवदत्त पाटील व किशोर चौधरी, वैशाली भिडे-बर्वे, ओमकार पाटोळे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जळगाव इनडोअर क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, आयोजन समिती, पंच, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि स्वयंसेवकांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!