शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ : फलटण एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव

स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाची परंपरा : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दारे खुली करत आता तंत्रज्ञानाधारित ‘नॉलेज हब’कडे वाटचाल

Screenshot

फलटण टुडे वृत्तसेवा (विशेष लेख):-
एखाद्या शिक्षणसंस्थेची खरी ओळख तिच्या इमारती, शाखा किंवा विद्यार्थ्यांच्या संख्येने होत नाही, तर त्या संस्थेने किती पिढ्यांचे जीवन घडवले, किती विद्यार्थ्यांना स्वप्न पाहण्याची आणि ती साकारण्याची संधी दिली आणि समाजाच्या भवितव्याला किती सक्षम दिशा दिली, यावर तिचे यश ठरते. या निकषांवर फलटण एज्युकेशन सोसायटीचा इतिहास हा केवळ एका संस्थेचा इतिहास न राहता ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षण प्रबोधनाची प्रेरणादायी गाथा ठरतो.
सन १८७१ मध्ये एका शाळेच्या माध्यमातून सुरु झालेल्या शैक्षणिक प्रवाहाने २०२६ मध्ये अमृत महोत्सवी टप्पा गाठला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाला दिलेले महत्त्व, सर्वसामान्य आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची उपलब्धता, काळानुरूप शिक्षण व्यवस्थेत केलेले परिवर्तन आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, संशोधन व नवोपक्रमावर आधारित शिक्षण व्यवस्थेकडे सुरुअसलेली वाटचाल – हा संपूर्ण प्रवास दूरदृष्टीच्या नेतृत्वाचा आणि शिक्षणावरील दृढ विश्वासाचा परिचय देणारा आहे.
राजाश्रयातून सुरुझालेली शिक्षणाची मुहूर्तमेढ
फलटण संस्थानातील तत्कालीन दूरदृष्टीच्या नेतृत्वाने शिक्षणाचे महत्त्व ओळखून सन १८७१ मध्ये ॲग्लो व्हर्नाक्युलर स्कूल सुरुकेली. त्या काळात शिक्षण ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची बाब असताना फलटणमध्ये सर्व जाती – धर्मांच्या मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्याचा विचार पुढे आला, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरते.
याहुन पुढे जात १८८४-८५ मध्ये मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरु करून स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. आज महिला शिक्षणाबाबत व्यापक चर्चा होत असली, तरी त्याच्या अनेक दशकांपूर्वी फलटणमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण झाली होती. ही बाब तत्कालीन नेतृत्वाची सामाजिक जाण आणि शिक्षणाबाबतची प्रगत दृष्टी स्पष्ट करणारी आहे.
पुढे शाळेची स्वतंत्र वास्तू उभी राहिली आणि दि. १ जानेवारी १८९५ रोजी तिचे मुधोजी हायस्कूल असे नामकरण झाले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या विकासाचा पाया भक्कम करण्याची ही प्रक्रिया पुढेही सुरुराहिली.

Screenshot

संस्थानापासून लोकशाहीपर्यंत शिक्षणाचा ध्यास कायम
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात संस्थानांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरुझाली. या संक्रमणकाळातही शिक्षणाची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी प्रयत्न झाले. पुढे दि. २७ फेब्रुवारी १९५१ रोजी फलटण एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आणि शिक्षणाची जबाबदारी संस्थात्मक स्वरूपात पुढे नेण्यास सुरुवात झाली.
स्थानिक शिक्षणप्रेमी नागरिक, शिक्षक आणि नेतृत्व यांच्या सहभागातून संस्थेने हळूहळू विस्तार घेतला. त्यातून मुधोजी हायस्कूलपासून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणाच्या विविध शाखा उभ्या राहिल्या, हा प्रवास केवळ संस्थेच्या विस्ताराचा नव्हता, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाजवळच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या मूलभूत विचाराचा होता.

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षणाची समान संधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे जावे लागू नये, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणाच्या संधी मर्यादित होऊ नयेत आणि ग्रामीण भागातूनही अभियंते, कृषितज्ज्ञ, फार्मासिस्ट, संशोधक, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील गुणवंत निर्माण व्हावेत, या व्यापक उद्देशाने संस्थेने शिक्षणाचा विस्तार केला.
आज प्राथमिक शिक्षणापासून ते व्यावसायिक आणि उच्च शिक्षणापर्यंत विविध पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहेत. मुधोजी महाविद्यालय, कृषी, अभियांत्रिकी, फार्मसी, उद्यानविद्या यांसारख्या शिक्षणाच्या विविध शाखांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे अधिक व्यापक झाली आहेत. यामुळे फलटण आणि परिसरातील विद्यार्थ्यांना आपल्या मातीत राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याची संधी निर्माण झाली आहे.

शिक्षणाची गुणवत्ता हीच खरी ओळख
केवळ शाखांची संख्या वाढवणे हा संस्थेचा उद्देश राहिलेला नाही. शिक्षणाच्या गुणवत्तेला समान महत्त्व देण्यात आले आहे. मुधोजी महाविद्यालयाला NAAC A+, तर अभियांत्रिकी महाविद्यालयाला NAAC A व NBA मानांकन मिळाले असल्याचा संस्थेचा गौरवशाली प्रवास आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जाही प्राप्त झाला आहे.
विद्यार्थ्यांनी विद्यापीठ पातळीवर मिळवलेली पदके, शिष्यवृत्ती, विविध स्पर्धांतील यश, क्रीडा क्षेत्रातील कामगिरी आणि शिक्षकांनी केलेले संशोधन, पेटंट व शैक्षणिक योगदान ही या गुणवत्तेची विविध रुपे आहेत.
यातून एक गोष्ट स्पष्ट होते – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळाली, तर ते कोणत्याही क्षेत्रात गुणवत्तेने पुढे जाऊ शकतात.

ग्रामीण नॉलेज हबची संकल्पना
आज जग वेगाने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, रोबोटिक्स, डेटा सायन्स, ऑटोमेशन आणि आधुनिक संशोधनामुळे पारंपरिक शिक्षणव्यवस्थेसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. या बदलत्या काळाची पावले ओळखून फलटण एज्युकेशन सोसायटीने आता ‘ग्रामीण नॉलेज हब’ म्हणून विकसित होण्याची दिशा स्वीकारली आहे.
ही संकल्पना केवळ मोठी इमारत किंवा आधुनिक प्रयोगशाळा उभारण्यापुरती मर्यादित नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल साधने, संशोधनाच्या संधी आणि जागतिक दर्जाचे कौशल्याधारित शिक्षण उपलब्ध करून देणे, हा त्यामागील व्यापक विचार आहे.

Screenshot

भविष्यातील शिक्षण AI आणि तंत्रज्ञानाधारित
अमृत महोत्सवी पर्वात पुढील २५ वर्षांसाठी आखण्यात आलेली दिशा विशेष महत्त्वाची आहे. AI आधारित शिक्षण, डिजिटल कॅम्पस, व्हर्च्युअल लॅब, संशोधन केंद्रे, इनक्युबेशन सेंटर, स्मार्ट शेती, ड्रोन तंत्रज्ञान, आधुनिक सिंचन व्यवस्था आणि ग्रीन कॅम्पस यांसारख्या संकल्पनांचा त्यात समावेश आहे.
विशेषतः कृषीप्रधान ग्रामीण भागासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी शिक्षण यांची सांगड अत्यंत महत्त्वाची आहे. ड्रोनच्या माध्यमातून शेतीचे निरीक्षण, अचूक सिंचन, माती – पाणी परीक्षण, हवामानाधारित शेती आणि डिजिटल कृषी व्यवस्थापन यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर भविष्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देऊ शकतो.

शिक्षणासोबत संशोधन आणि नवोपक्रम
भविष्यातील विद्यार्थी केवळ नोकरी शोधणारा नसून नवीन कल्पना निर्माण करणारा, संशोधन करणारा आणि रोजगार निर्माण करणारा उद्योजक बनला पाहिजे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात संशोधनाची संस्कृती, नवोपक्रमाला प्रोत्साहन आणि स्टार्टअपसाठी इनक्युबेशनची सुविधा निर्माण करणे हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरेल.
फलटणसारख्या ग्रामीण भागात अशी व्यवस्था निर्माण झाली तर येथील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई किंवा इतर महानगरांकडे केवळ संधीच्या शोधात जाण्याची आवश्यकता कमी होईल. उलट ज्ञान, संशोधन आणि उद्योगाची नवी परिसंस्था फलटणमध्येच निर्माण होऊ शकते.

नेतृत्वाची दूरदृष्टी आणि संस्थेची वाटचाल
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या या प्रवासात संस्थेच्या नेतृत्वाची दूरदृष्टी महत्त्वाची ठरली आहे. विद्यमान अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सोसायटी नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विस्ताराला आणि गुणवत्तावाढीला चालना मिळत आहे.
शिक्षणाचा विस्तार, व्यावसायिक अभ्यासक्रम, विद्यार्थी केंद्रित उपक्रम, आधुनिक पायाभूत सुविधा आणि भविष्यातील तंत्रज्ञानाधारित शिक्षण यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न संस्थेच्या पुढील वाटचालीत दिसून येतो.

अमृत महोत्सव म्हणजे नव्या संकल्पाचा प्रारंभ
१८७१ मध्ये एका छोट्याशा शाळेतून सुरु झालेला शिक्षणाचा प्रवाह आज विविध शाखा, महाविद्यालये, अभ्यासक्रम आणि हजारो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विस्तारला आहे. या प्रवासात अनेक पिढ्या घडल्या, अनेक कुटुंबांचे जीवन बदलले आणि फलटणच्या शैक्षणिक ओळखीला व्यापक प्रतिष्ठा मिळाली. म्हणूनच फलटण एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव हा केवळ भूतकाळातील कामगिरीचा उत्सव नाही. तो भूतकाळातील शैक्षणिक वारसा जपत भविष्याच्या शिक्षणव्यवस्थेची नवी दिशा ठरवण्याचा संकल्प आहे.


१८७१ मध्ये रोवलेले शिक्षणाचे रोपटे १९५१ मध्ये संस्थात्मक रुपाने बळकट झाले आणि २०२६ मध्ये त्याचा विस्तार एका विशाल वटवृक्षासारखा झाला आहे. आता या वटवृक्षाच्या सावलीतून पुढील पिढ्यांना केवळ शिक्षण नव्हे, तर ज्ञान, कौशल्य, संशोधन, तंत्रज्ञान आणि आत्मविश्वास मिळणे हीच अमृत महोत्सवाची खरी फलश्रुती ठरेल.
ग्रामीण विद्यार्थ्याला जागतिक दर्जाचे शिक्षण आणि ग्रामीण भागाला ज्ञानाधारित विकासाची दिशा – या दोन गोष्टींचा संगम घडवून आणण्यात फलटण एज्युकेशन सोसायटी यशस्वी झाली, तर ग्रामीण नॉलेज हब ही संकल्पना केवळ फलटणची नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रासाठी अनुकरणीय ठरु शकते.
शिक्षणाची परंपरा जपून तंत्रज्ञानाचे भविष्य स्वीकारणारी ही वाटचाल म्हणजेच फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवाची खरी ओळख होय.

  • अमोल सुलोचना रामचंद्र नाळे (सर)
    मुधोजी हायस्कूल फलटण.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!