कार्यशाळेप्रसंगी मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी श्री सी.जी. मठपती, प्राचार्य वसंत शेडगे , बी.आर.सी. समन्वयक सौ. दमयंती कुंभार व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १७ सप्टेंबर २०२६): – फलटण तालुका इंग्लिश टीचर्स असोसिएशन (PTETA), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) फलटण, पंचायत समिती शिक्षण विभाग (BRC) आणि तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुधोजी हायस्कूल येथे ५ वी ते १० वीच्या इंग्रजी विषय शिक्षकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेत उच्चारणशास्त्र, अध्यापनात ‘एआय’चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रभावी वापर, १० वी बोर्ड परीक्षेचे मूल्यमापन आणि भाषा अलंकार या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. चंद्रकांत सस्ते, पंकज बोबडे आणि सुजित जमदाडे यांनी सुलभक म्हणून काम पाहिले.

उद्घाटन प्रसंगी ‘डाएट’चे प्राचार्य जितेंद्र साळुंखे यांनी सातारा जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात फलटण तालुक्याचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले. समारोपाच्या वेळी गटशिक्षणाधिकारी सी. जी. मठपती यांच्या हस्ते सेवानिवृत्त आणि नवनियुक्त इंग्रजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
इंग्लिश टीचर्स असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची निवड:
कार्यक्रमादरम्यान असोसिएशनच्या अध्यक्षपदी पंकज बोबडे, उपाध्यक्षपदी सौ. शारदादेवी मोहिते आणि सचिवपदी सुजित जमदाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी बी.आर.सी. समन्वयक सौ. दमयंती कुंभार, असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्राचार्य एस. व्ही. सावंत आणि मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी विशेष सहकार्य केले.



