फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २ ऑक्टोबर २०२६): –
मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे शुक्रवारी (दि. २ ऑक्टोबर २०२६) अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य वसंतराव शेडगे, उपमुख्याध्यापक ए. वाय. ननावरे, पर्यवेक्षक विजय लोंढे पाटील, पर्यवेक्षिका सौ. पूजा पाटील आणि उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य सोमनाथ माने यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये उच्च माध्यमिक विभागाचे उपशिक्षक सुधाकर वाकुडकर यांनी महात्मा गांधी यांच्या ‘सत्याचे प्रयोग’ या आत्मकथेतील सत्य आणि अहिंसेच्या विचारांवर सविस्तर प्रकाश टाकला. तसेच ‘जय जवान, जय किसान’ या अजरामर घोषणेचे जनक लालबहादूर शास्त्री यांच्या देशसेवेतील आणि साध्या राहणीच्या विचारांचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.

अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील कार्याचा आणि संघर्षाचा पट उलगडून दाखवला. कोणत्याही शस्त्राचा वापर न करता केवळ सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या बळावर ब्रिटिशांना कसे झुकवले, याचे सुंदर वर्णन त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वनिता लोणकर यांनी केले, तर कु. तृप्ती शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सकाळ, दुपार व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


