जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत मुधोजी हायस्कूलचा जलवा; १९ वर्षांखालील संघाची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड…

फलटण टुडे वृत्तसेवा ( सातारा दि ४ ऑक्टोबर २०२६):-
सातारा येथील छत्रपती श्री शाहू स्टेडियमवर २८ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले आहे. या यशासह मुधोजीच्या संघाने गडहिंग्लज येथे होणाऱ्या विभागस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले आहे.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत मुधोजी हायस्कूलच्या मुलांनी सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्ध्यांवर आपले वर्चस्व कायम ठेवले. पहिल्या सामन्यात मुधोजीच्या संघाने वाई तालुक्याचा ३-० अशा एकतर्फी फरकाने पराभव करत दणदणीत सुरुवात केली. त्यानंतर पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या उपांत्य सामन्यात पाचगणी तालुक्याविरुद्ध ४-३ अशा फरकाने संघर्षपूर्ण विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात कराड तालुक्याच्या बलाढ्य संघाला ५-३ अशा गोलफरकाने नमवत मुधोजी हायस्कूलने जिल्हास्तरीय विजेतेपदावर आपले नाव कोरले.

या विजयी संघाला जेष्ठ प्रशिक्षक संजय फडतरे,अमित काळे यांनी विशेष परिश्रम घेतले, तर संघ व्यवस्थापक म्हणून संकेत मठपती यांनी जबाबदारी सांभाळली.

मुधोजी हायस्कूलच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल आणि विभागस्तरीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, फ.ए.सो. क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या नियामक मंडळ सदस्य,फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम,तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा , सुधीर अहिवळे, प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, ज्युनिअर कॉलेज उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, विजय पाटील, सौ. पूजा पाटील, क्रीडा मार्गदर्शक आणि सर्व क्रीडाप्रेमींनी विजेत्या खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे विशेष अभिनंदन करून गडहिंग्लज येथील पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!