जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सिद्धनाथ हायस्कूलचे घवघवीत यश; ५ सुवर्ण, ८ रौप्य व १ कांस्यपदकांसह १४ मल्लांची विभागस्तरीय स्पर्धेत धडक

फलटण टुडे वृत्तसेवा ( शेंद्रे (सातारा) दि ४ ऑक्टोबर २०२६):-
शेंद्रे (सातारा) येथे २ व ३ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर COLLEGE, म्हसवडच्या विद्यार्थ्यांनी दणदणीत यश संपादन केले आहे. विविध वयोगट व वजनगटांत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत शाळेच्या मल्लांनी ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि १ कांस्यपदकासह एकूण १४ पदकांवर आपले नाव कोरले. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सर्व १४ पदकविजेत्या मल्लांची विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


या स्पर्धेत यशराज विलास रुपनवर याने १४ वर्षांखालील मुलांच्या ४४ कि.ग्रॅ. वजनगटात सुवर्णपदक मिळवून विशेष कामगिरी केली, तर याच गटात ३५ कि.ग्रॅ. वजनगटात विश्वजित ढवळे याने रौप्यपदक पटकावले. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात मानसी विरकर हिने ५३ कि.ग्रॅ. वजनगटात सुवर्ण, अनुष्का काळेल हिने ४९ कि.ग्रॅ. वजनगटात रौप्य, तर पूजा सरतापे हिने ४६ कि.ग्रॅ. वजनगटात कांस्यपदक पटकावले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात साहिल करांडे याने ६० कि.ग्रॅ. वजनगटात सुवर्णपदकाची कमाई केली, तर अंगद बुधवाले (४५ कि.ग्रॅ.), शुभम जाधव (४८ कि.ग्रॅ.), सुमित मसुगडे (६३ कि.ग्रॅ.) आणि दुर्गेश दोलताडे (७१ कि.ग्रॅ.) यांनी आपापल्या वजनगटांत रौप्यपदके मिळवली. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात गणेश जाधव याने ७७ कि.ग्रॅ. व श्रीधर नरळे याने ८२ कि.ग्रॅ. वजनगटात सुवर्णपदके पटकावून वर्चस्व सिद्ध केले, तर रंजित करचे (८० कि.ग्रॅ.) व धनराज राजगे (६० कि.ग्रॅ.) यांनी रौप्यपदकांवर आपले नाव कोरले.
जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकलेल्या या सर्व १४ मल्लांची येत्या ५ व ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सातारा येथे होणाऱ्या विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरावरील यशाची पुनरावृत्ती करत विभागस्तरीय स्पर्धेतही हे मल्ल चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.


विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटी, संस्थेचे पदाधिकारी, सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांनी विजेत्या मल्लांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कुस्तीच्या आखाड्यात सिद्धनाथच्या मल्लांनी मिळविलेल्या या यशामुळे म्हसवड परिसराच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!