फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ५ ऑक्टोबर २०२६):-: पुणे येथील विश्रांतवाडी परिसरात अवघ्या ११ वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्यंत संतापजनक व मन हेलावून टाकणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा नाभिक समाजाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला आहे. या नराधम आरोपीवर POCSO सह कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे आणि आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी, या प्रमुख मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.
२२ सप्टेंबर रोजी घडलेल्या या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण राज्यात व नाभिक समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने खालील प्रमुख मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे:

या प्रकरणाचा तपास पूर्णपणे निष्पक्ष, वेगवान व पारदर्शक पद्धतीने करून आरोपीवर पॉक्सो (POCSO) कायद्यासह गंभीर कलमांनुसार लवकरात लवकर दोषारोपपत्र (चार्जशीट) न्यायालयात दाखल करण्यात यावे. तसेच या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक किंवा विशेष न्यायालयात चालवून नराधम आरोपीला फाशीचीच शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

याशिवाय पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाची ओळख व प्रतिष्ठा अबाधित ठेवून त्यांना २४ तास पुरवण्यात आलेले पोलीस संरक्षण कायम ठेवावे. कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा धमकी येणार नाही याची दक्षता घेऊन पीडितेला तातडीने वैद्यकीय, मानसिक व कायदेशीर मदत उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

ही घटना केवळ एका कुटुंबावर झालेला अन्याय नसून समाजाच्या सुरक्षिततेला दिलेले गंभीर आव्हान आहे. “अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराला माफी नाही – दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” असा इशारा देत नाभिक समाजाच्या वतीने प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी तीव्र अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ सातारा जिल्हा अध्यक्ष श्री आंबादास दळवी,राज्य उपाध्यक्ष शंकरराव मर्दाने, नाभिक समाज सेवक पोपटराव काशीद, पोपटराव कर्वे सातारा जिल्हा सचिव आनंद राऊत, .सुहास लक्ष्मण काशीद., राजशेखर राव साळुंखे., दीपक साळुंखे, पै. वीरेंद्र रणदिवे व नाभिक समाज उपस्थित होता

