
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि. १२ ऑक्टोबर २०२६):-
जपानमधील नागोया येथे पार पडलेल्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक सुवर्णविजय मिळवला. या विजयात सात गोल आणि दोन हॅट्रिक नोंदवून मोलाचा वाटा उचलणारी फलटणची सुवर्णकन्या व कोळकी गावाची लेक कु. ऋतुजा दादासो पिसाळ हिच्या या अभूतपूर्व यशाचा गौरव करण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटी, नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट आणि महात्मा शिक्षण संस्था यांच्या वतीने सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य रॅली व सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.
सोहळ्याची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत क्रांतिसिंह नाना पाटील चौकात येऊन ऋतुजाचा सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला, शुभेच्छा दिल्या आणि पुढील कार्यक्रमास मार्गस्थ झाले.

यावेळी ओपन जीप मधून ऋतुजा ची रॅली ढोल-ताशांचा गजर आणि मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या लेझीमच्या ठेक्यावर ही भव्य रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि महावीर स्तंभ मार्गे मुधोजी हायस्कूलच्या प्रांगणात दाखल झाली. प्रांगणात विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव करत स्वागत केले. यावेळी महिला शिक्षकांनी ऋतुजाचे औक्षण केले. व स्वागतगीताने उपस्थितांचे स्वागत केले, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी ऋतुजाच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले की, अंतिम सामन्यात बलाढ्य चीनचा १-० असा पराभव करत भारताने ४४ वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवला आहे. फलटणमध्ये हॉकीची सुरुवात जगन्नाथ धुमाळ यांनी केली आणि महेश खुटाळे यांनी ही परंपरा पुढे चालवली. आज फलटणचे ऋतुजा पिसाळ, अक्षदा ढेकळे, वैष्णवी फाळके आणि आदित्य लाळगे हे खेळाडू भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत, ही संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळते हेच ऋतुजाने दाखवून दिले आहे, असे सांगत त्यांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळ हिला सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने १ लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आला. तसेच ऋतुजाच्या आई-वडिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात महात्मा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब चोरमले यांनी ऋतुजाच्या यशाचा गौरव करत तिची दखल महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन तिला शासकीय देणगी व सन्मान द्यावा, अशी विनंती करणार असल्याचे सांगितले.
माजी क्रीडा अधिकारी महेश खुटाळे यांनीही आपल्या मनोगतातून ऋतुजाच्या बालपणापासूनच्या क्रीडा प्रवासावर प्रकाश टाकला.
सत्काराला उत्तर देताना ऋतुजाने सांगितले की, आपली सुरुवात जरी छोट्या शाळेतून झाली असली तरी स्वप्ने मोठी पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे; या मातीतून अनेक खेळाडू घडले पाहिजेत.

या प्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ताबापू अनपट, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, उपसरपंच डॉ. अशोक नाळे, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, नियामक मंडळ सदस्य भोजराज निंबाळकर, चंद्रकांत पाटील, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी सुधीर अहिवळे, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंतराव शेडगे, मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य बी. डी. काळे, उपप्राचार्य ए वाय ननावरे , सोमनाथ माने , पर्यवेक्षक विजय पाटील , सौ पूजा पाटील दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष बाहुबली शहा, उपाध्यक्ष सचिन लाळगे, सचिव महेश खुटाळे, महेंद्र जाधव , सूरज जाधव , सुजित निंबाळकर, विपुल गांधी, ऋषी पवार , विनय नेरकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलिमा देशमुख व प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी केले, तर आभार प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी मानले.

