फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. 14 ऑक्टोबर २०२६):-: खरीप हंगामातील सोयाबीनसह इतर पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असताना, शेतातील पिकांचे अवशेष शेतकऱ्यांनी न जाळता त्यावर प्रक्रिया करून उपयुक्त चारा निर्मिती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. पिकांचे अवशेष जाळल्याने जमिनीची सुपीकता नष्ट होते आणि प्रदूषणात वाढ होते. या उलट आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या अवशेषांपासून पौष्टिक चारा बनवल्यास पशुधनाला फायदा होऊन शेतकऱ्यांची आर्थिक बचत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात टंचाई आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, उपजिल्हाधिकारी नुतन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात संभाव्य टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून टंचाई दूर करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
वृक्ष लागवडीचे नियोजन करावे अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून महावितरणने पाणी पुरवठा योजनांची वीज जोडणी तोडू नये. तसेच जिथे गरज असेल तिथे पाणी उपसा बंदी लागू करावी. रोजगार हमी योजनेअंतर्गत किमान ३० जूनपर्यंत चालेल इतकी कामे यंत्रणांनी नियोजित करावीत आणि प्रत्येक गावात पुरेशी कामे उपलब्ध राहतील याची खबरदारी घ्यावी. प्रत्येक शेतात किमान एक जलतारा काम प्राधान्याने घेण्यात यावे. जलस्रोतांचे पुनर्जीवन करण्यावर भर देताना गाव तलाव, पाझर तलाव आणि साठवण तलावांतील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. यासोबतच मोठी जल पुनर्भरण कामे करण्यात यावीत. तसेच वन विभागाने वन्य प्राण्यासाठी पाणवठ्यांची व्यवस्था करावी जेणे करुन वन्य प्राणी नागरी वस्थीत येणार नाहीत.
ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही टंचाई आराखडा तयार करावा तसेच शहरातील पाण्याची गळती थांबवण्यासाठी त्वरित तक्रार करता यावी म्हणून एक स्वतंत्र फोन क्रमांक निर्माण करावा. नागरी पाणी पुरवठा योजनांचे सर्वेक्षण करून गळती बंद करावी किंवा ते पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. नागरी पाणी पुरवठा योजनांसाठी पर्यायी व्यवस्था तयार करण्यात यावी. भुजल सर्वेक्षण विभागाने प्रभावी भागात रिचार्ज शाफ्ट कामे प्रस्तावित करावीत तसेच बंद बोअरवेलमध्ये पुन्हा जलभरणासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.
सोयाबीन व खरीप पिकांचे अवशेष न जाळता चारा निर्मिती करा – जिल्हाधिकारी संतोष पाटील
