फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.23 नोव्हेंबर २०२६): सातारा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपले हयातीचे दाखले ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत केंद्र शासनाने विकसित केलेल्या ‘जीवन प्रमाणपत्र’ पोर्टलद्वारे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती आरती नांगरे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या स्तरावरून १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवरून जीवन प्रमाण अॅप डाउनलोड करून किंवा www.jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक ती माहिती भरून हयातीचा दाखला ऑनलाइन जमा करता येईल.

डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी युट्यूबवर ट्रेझरी ऑफीस सातारा नावाने शोधल्यास सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ज्या निवृत्तीवेतनधारकांनी बँकेत जाऊन कागदोपत्री हयातीच्या दाखल्यावर स्वाक्षरी केली असेल, त्यांनीही ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत स्वतः, संबंधित बँकेमार्फत अथवा जिल्हा कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष येऊन जीवन प्रमाण पोर्टलवर डिजिटल दाखला नोंदवून घ्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

