जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण म्हणजे अस्सल बावनकशी सोनं : प्रा रवींद्र कोकरे

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १८ एप्रिल २०२६):-
लहानपणीचा काळ सुखाचा, संस्काराचा, आनंदाचा, खेळण्याचा, बागडण्याचा तसेच जीवन घडण्याचा असतो. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण म्हणजे अस्सल बावनकशी सोनं आहे. मुलांच्यात मूल्य निर्माण करणारी जिल्हा परिषद शाळा महाराष्ट्राचे वैभव आहे. असे गौरवउद्गार ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार प्रा रवींद्र कोकरे यांनी काढले.
जिल्हा परिषद शाळा कांबळेश्वर (बारामती ) येथे आनंददायी शिक्षण या विषयांवर आयोजित कार्यक्रमात प्रा रवींद्र कोकरे यांनी विचार मांडले. कोकरे सरांनी दर्जेदार साहित्यकृतीचा संच शाळेच्या ग्रंथालयाला भेट दिला.
हसत, खेळत, हुंदडत शिक्षण ही जिल्हा परिषद शाळेची कामगिरी आहे. सर्वसामन्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण देणे ही गुरुजीची जबाबदारी आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, खेळ, व्यायाम, परिसर स्वछता, वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लावणे. फळे कापून वाढदिवस साजरा करावा. थोरा मोठ्यांची आज्ञापालन करावे. उन्हाळ्यात पशू पक्ष्यांची काळजी घ्यावी.अशी मते प्रा कोकरे सरांनी व्यक्त केली.
कोकरे सरांनी लहान मुलांना समजेल अश्या भाषेत हसत खेळत व्याख्यान दिल्याने त्यांना अतिशय भावले. सूत्रसंचलन मुख्याध्यापक जयवंत कांबळे, आभार प्रदर्शन रेवणनाथ सर्जे, नियोजन ज्ञानदेव सस्ते, निर्मला खताळ मॅडम यांनी केले. अंगणवाडी, बालवडी सेविका, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!