यशस्वी होण्यासाठी ‘सचोटी, हातोटी आणि कसोटी’ आवश्यक: प्रमुख पाहुणे अनिल कुलकर्णी
विद्यार्थ्यांच्या विश्वासामुळेच महाविद्यालय ‘स्वायत्त’ म्हणून नावारूपाला: श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण टुडे वृत्तसेवा ( पुणे, दि १२ जुलै २०२६):- फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण या स्वायत्त संस्थेचा ‘माजी विद्यार्थी मेळावा पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथील जीएमके बँक्वेट हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. विविध बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अत्यंत भावनिक आणि आनंददायी ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे पूजा प्रिसिजन इंजिनिअरिंग लि., चाकणचे चेअरमन श्री. अनिल कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
उद्योजक बनण्याचे आणि आव्हानांना सामोरे जाण्याचे आवाहन
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात श्री. अनिल कुलकर्णी यांनी केले तसेच शिक्षण आणि उद्योग जगतातील बदलत्या प्रवाहांवर प्रभावी प्रकाश टाकला. माजी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करताना ते म्हणाले,
“आजच्या तरुण अभियंत्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनण्यावर भर दिला पाहिजे. जीवनात आणि व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर ‘सचोटी, हातोटी आणि कसोटी’ या त्रिसूत्रीवर खरे उतरावे लागते. या गुणांच्या जोरावरच तुम्ही जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करू शकता.”
विद्यार्थ्यांनी दाखवलेला विश्वास हीच आमची ताकद: श्रीमंत संजीवराजे
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले,
“विद्यार्थी हेच कोणत्याही महाविद्यालयाचे खरे ब्रँड अॅम्बेसेडर असतात आणि तेच संस्थेचे नाव मोठे करत असतात. सन २०११ मध्ये जेव्हा हे महाविद्यालय सुरू झाले, तेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास अत्यंत मोलाचा होता. तुमच्या याच विश्वासामुळे आज हे महाविद्यालय ‘ए’ श्रेणी प्राप्त स्वायत्त, महाविद्यालय म्हणून नावारूपाला आले आहे.”
दिग्गजांची उपस्थिती आणि आठवणींचा उजाळा
याप्रसंगी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासह संस्थेचे सीडीसी सदस्य श्री. हेमंत रानडे, भोजराज नाईक निंबाळकर, शिरीष दोशी, शिरीष भोसले संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम (सर) उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात माजी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला आणि संस्थेच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित केले. या मेळाव्याला आलेल्या विविध बॅचच्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, आपले अनुभव शेअर केले आणि महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी तसेच सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सतत सहकार्य करण्याची व सक्रिय भाग घेण्याची ग्वाही दिली.
गुणवत्तेची परंपरा
फलटण एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सातारा जिल्ह्यातील पहिले ए श्रेणीचे (NAAC ‘A’ Grade) महाविद्यालय असून, याला नॅक (NAAC) आणि नॅशनल बोर्ड ऑफ अक्रिडिटेशन (NBA) कडून मान्यता मिळाली आहे. या महाविद्यालयाने अभियांत्रिकी क्षेत्रात गुणवत्तेच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता प्रा. अमरसिंह रणवरे यांनी मानलेल्या आभारप्रदर्शनाने झाली.

